---Advertisement---

मुल्लानपूर कसोटीत टीम इंडियाचा विक्रमी विजय! अफगाणिस्तान तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 300 धावांनी पराभूत

On: सोमवार, जून 8, 2026 3:36 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड, मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना खेळला गेला, ज्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. 6 जूनपासून खेळल्या गेलेल्या या अविस्मरणीय कसोटी सामन्याचा शेवट भारताच्या विजयाने झाला. भारताने हा सामना एका डाव आणि 300 धावांनी जिंकला. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आणि तोच या सामन्याचा सामनावीर ठरला.

या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केएल राहुल आणि गिल यांनी शतके, ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके केली. त्यामुळे भारताने पहिल्याच डावात 564 धावसंख्येचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताचा पहिला डाव लवकरच संपुष्टात आला. मानवने त्याच्या जादुई स्पेलने अफगाणि फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकूच दिले नाही. त्याने 22 षटकांत 33 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रभावी फिरकीसमोर अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताकडे 412 धावांची भक्कम आघाडी आली. या डावात अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक 60 धावा केल्या.

भारताने अफगाणिस्तानला फॉलो-ऑन दिला. सलामीवीर सेदिकुल्ला अटलने चांगली सुरूवात केली, मात्र त्याला बाकी फलंदाजांची योग्य साथ मिळाली नाही. तो 42 धावा करत बाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच राहिल्या. या डावात भारताकडून कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त कामगिरी केली.

कुलदीपने 7.5 षटकांत 30 धावा देत 3 विकेट्स आणि सुंदरने 11 षटकांत 36 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मानव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. हा कसोटी सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग नव्हता. तसेच आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना 13 जूनला धरमशाला येथे खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---