देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2022-2023) या स्पर्धेला 12 नोव्हेंबरपासून सुरूवात होईल. या स्पर्धेसाठी आता सर्व राज्य संघटनांनी आपले संघ जाहीर करण्यास सुरुवात केली असून, मुंबईने देखील आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध व मजबूत संघ असलेल्या मुंबईने या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य निवडकर्तो सलील अंकोला यांनी संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवी अजिंक्य रहाणे करेल. तर वेगवान गोलंदाज सिल्वेस्टर डिसूझा हा संघातील एकमेव नवा चेहरा असेल. मुंबईने रहाणेच्याच नेतृत्वात नुकतीच संपन्न झालेली सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे रहाणे याचे कर्णधारपद देखील कायम आहे.
रहाणे संघाचे नेतृत्व करत असला तरी, भारतीय संघाचे सदस्य असलेले श्रेयस अय्यर व शार्दुल ठाकूर हे या स्पर्धेसाठी उपलब्ध नसतील. तसेच, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. 2020-2021 मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या फिरकीपटू प्रशांत सोलंकी याला संघात स्थान मिळाले नाही. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हा दुखापतीमुळे आणखी बराच काळ निवडीसाठी उपलब्ध नसेल. ई गटात समावेश असलेला मुंबई संघ 12 नोव्हेंबर रोजी रांची येथे बंगालविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, सुवेद पारकर, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), रॉयस्टन डायस, तुषार देशपांडे, अमन खान, सिल्वेस्टर डिसूझा, साईराज पाटील, मोहित अवस्थी, शशांक आतर्डे, अरमान जाफर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो संघात असणे म्हणजे हत्ती पोसण्यासारखे’; दिग्गजाचे बवुमावर जहरी टीकास्त्र
VIDEO: ‘बस झाले’, चाहत्यांना पाहून विराटने जोडले हात; कोहलीची क्यूट रिऍक्शन व्हायरल