गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी सहा गोलांचा थरार झालेल्या लढतीत मुंबई सिटी आणि एफसी गोवा यांनी 3-3 अशी बरोबरी साधली. भरपाई वेळेतील दोन गोलांचा यात समावेश होता. मुंबई सिटीच्या रॉलीन बोर्जेसच्या गोलनंतर गोव्याला ईशान पंडिता याच्या गोलमुळे एक गुण खेचून आणता आला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धात सहा मिनिटांच्या अंतराने मुंबई सिटीचे दोन गोल झाले. मध्य फळीतील फ्रान्सच्या 25 वर्षीय ह्युगो बुमूसने 20व्या मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर आघाडी फळीतील इंग्लंडच्या 34 वर्षीय अॅडम ली फाँड्रे याने संघाचा दुसरा गोल केला. गोव्याला मध्य फळीतील 26 वर्षीय स्थानिक खेळाडू ग्लेन मार्टिन्स याने मध्यंतरास काही सेकंद बाकी असताना खाते उघडून दिले.
त्यानंतर 51व्या मिनिटास आघाडी फळीतील स्पेनचा 37 वर्षीय ईगोर अँग्युलो याने बरोबरी साधून दिली. भरपाई वेळेत मुंबईचा 28 वर्षीय मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस याने संघाचा तिसरा गोल केला. बोर्जेस मुळचा गोव्याचा आहे. यानंतर आणखी नाट्य घडले. दिल्लीचा 22 वर्षीय बदली स्ट्रायकर ईशान पंडिता याने गोव्याला बरोबरी साधून दिली.
गोव्याने 16 सामन्यांत आठवी बरोबरी साधली असून पाच विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 23 गुण झाले. त्यांनी हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांना गुणांवर गाठले आणि सरस गोलफरकावर मागे टाकले. गोव्याचा गोलफरक 5 (24-19) आहे. त्यामुळे गोव्याला तिसरे स्थान मिळाले. हैदराबादचा गोलफरक 4 (20-16), तर नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलफरक 1 (21-20) असा आहे.
मुंबई सिटीला 16 सामन्यांत चौथी बरोबरी पत्करावी लागली असून 10 विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 34 गुण झाले. त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले. एटीके मोहन बागान 15 सामन्यांतून 30 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने जिंकली. 20व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक एदू बेदीयाने चेंडू मारल्यानंतर मुंबईने प्रतिआक्रमण रचले. मध्यरक्षक रेनीयर फर्नांडीस याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्याकडून पास मिळताच अॅडमने बुमुस याच्यासाठी संधी निर्माण केली. बुमूसला रोखण्यासाठी गोव्याचा बचावपटू सेव्हीयर गामा याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण बुमूसने अचूक टायमिंग साधत फटका मारून गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग याला चकविले.
त्यानंतर अॅडमने स्वतःचे नाव स्कोअरशीटवर नोंदविले. हा गोल कॉर्नरवर झाला. मध्यरक्षक बिपीन सिंगने घेतलेल्या कॉर्नरवर मध्य फळीतील हर्नान सँटाना याने हेडिंग केले. धीरजने चेंडू थोपविला, पण रिबाऊंडवर अॅडमने फिनिशींग केले.
पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे ओर्टीझ याने डावीकडून आगेकूच केली. त्याने मुंबई सिटीच्या क्षेत्रात मध्यभागी असलेल्या मार्टिन्सला पास दिला. मार्टिन्सने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवून फटका मारला. त्यावेळी मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याला डावीकडे झेप घेऊनही चेंडू अडविता आला नाही. क्रॉसबारला लागून चेंडू नेटमध्ये गेला.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युरा याने रचलेल्या चालीवर अँग्युलोने हेडिंगवर लक्ष्य साधले. त्यावेळी अँग्युलो ऑफसाईड असल्याचे समजून अमरींदर जागचा हाललाच नाही. चेंडू नेटमध्ये गेला आणि हा गोल वैध असल्याचा निर्णयही रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी दिला.
भरपाई वेळेत मुंबईला डावीकडे फ्री किक मिळाली. त्यावर बुमूसने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूला बोर्जेसने नेटजवळून फिनिशींग केले. त्यावेळी गोव्याच्या खेळाडूंनी बोर्जेसला मार्किंग केले नव्हते. याचा बोर्जेसने फायदा उठविला. त्यानंतर गोव्याला फ्री किक मिळाली. बेदीयाने घेतलेल्या फ्री किकवर पंडिताने हेडिंगवर लक्ष्य साधले.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
आयएसएल २०२०-२१ : बेंगळुरू-चेन्नईयीनमध्ये गोलशून्य बरोबरी