सय्यद मुश्ताक अलीच्या स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने इतिहास रचला आहे. बुधवारी11 डिसेंबर रोजी मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना विदर्भाविरुद्ध सामना रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने 20 षटकात 6 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ, अजिक्य रहाणे, शिवम दुबे यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबईने 4 चेंडू आणि 6 विकेट्स राखून ही धावसंख्या गाठली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईने विश्वविक्रमही केला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात बाद फेरीत पाठलाग केलेले हे सर्वात मोठे लक्ष्य आहे.
याआधी हा विक्रम कराची डॉल्फिनच्या नावावर होता. ज्यांनी 2010 मध्ये बँक टी20 कप दरम्यान रावळपिंडी रॅम्सविरुद्ध उपांत्य फेरीत 210 धावांचा पाठलाग केला होता.
मुंबईच्या धावसंख्येबाबत बोलायचे तर वयाच्या 36व्या वर्षी युवा खेळाडूचा उत्साह दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. यावेळी त्याला सलामीवीर पृथ्वी शॉचीही पूर्ण साथ मिळाली. या दोघांनी पहिल्या 7 षटकात पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली.
पृथ्वी शॉने 26 चेंडूत 5 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 45 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 84 धावांची शानदार खेळी केली.
मात्र, 83 धावांवर पृथ्वी शॉची विकेट पडल्यानंतर मुंबईचा संघ थोडा गडबडला. श्रेयस अय्यर 5 तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव 9 धावांवर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर शिवम दुबेसह 21 वर्षीय सूर्यांश शेडगेने धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली. 15व्या षटकात रहाणेची विकेट पडल्यानंतर या दोघांनी पुढच्या 4 षटकांत 67 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबई संघाने उपांत्य फेरी गाठली असून. ज्यात त्यांचा सामना बडोद्याशी होणार आहे.
हेही वाचा-
Birthday Special; युवराज सिंगचे 5 मोठे रेकॉर्ड जे आजही अभेद्य, आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी
या 3 कारणांमुळे अजिंक्य रहाणे आयपीएल 2025 मध्ये केकेआरचे नेतृत्व करु शकतो
IND vs AUS: ब्रिस्बेन कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी सुखद बातमी, स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त