मुंबईनं गुरुवारी (14 मार्च) विक्रमी 42व्यांदा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. या कामगिरीवर खूष होऊन मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) मोठी घोषणा केली आहे. एमसीएनं रणजी ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईनं विदर्भावर 169 धावांनी विजय मिळवला.
रणजी विजेत्या मुंबई संघाला आता 5 कोटी रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि सर्वोच्च परिषदेनं रणजी करंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी हा सीजन शानदार राहिला असून या हंगामात त्यांनी सात जेतेपदे पटकावली. याशिवाय मुंबईचा संघ बीसीसीआयच्या सर्व वयोगटातील स्पर्धांच्या बाद फेरीत पोहोचला.
रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईनं आठ वर्षांचा दुष्काळ संपवून गुरुवारी विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. यासह संघानं विक्रमी 42व्यांदा रणजी करंडकावर नाव कोरलं. स्पर्धेच्या इतिहासात मुंबई संघानं 90 पैकी 48 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी मुंबईनं 2015-16 च्या मोसमात शेवटचं रणजी विजेतेपद पटकावलं होतं.
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं अशक्यप्राय लक्ष्य दिलं होतं. विदर्भानं या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगला लढा दिला. विदर्भाची टीम शेवटच्या दिवशी 368 धावांवर ऑलआऊट झाली. तत्पूर्वी विदर्भानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा पहिला डाव 224 धावांत आटोपला. शार्दूल ठाकूरनं 69 चेंडूत सर्वाधिक 75 धावा ठोकल्या. तर पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानीनं अनुक्रमे 46 आणि 37 धावांचं योगदान दिलं. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात, विदर्भाची टीम पहिल्या डावात अवघ्या 105 धावांवर ऑलआऊट झाली. टीमचा एकही खेळाडू 30 धावांपर्यंत पोहचू शकला नाही. यश राठोडनं 67 चेंडूत सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनूष कोटियान यांनी 3-3 विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात मुंबईनं मुशीर खानचं शतक (136) व श्रेयस अय्यर (95), अजिंक्य रहाणे (73) आणि शम्स मुलानी (50) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 418 धावांचा डोंगर रचला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 : अखेर बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयस अय्यरला मिळणार केंद्रीय करार, अन्…
विश्वासाला पात्र ठरले ‘हे’ दोन खेळाडू! केवळ अजित आगरकरांमुळे होऊ शकलं कसोटी पदार्पण
IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा संघात समावेश