येत्या 1 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचे चाहते मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याविरोधात मोठ्या प्रमाणात बूइंग करण्याची शक्यता पाहता, एमसीए अशा चाहत्यांवर कारवाई करणार असल्याचं वृत्त माध्यमांत आलं होतं. मात्र आता स्वत: एमसीएनं या वृत्ताचं खंडण केलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशननं म्हटलं आहे की, “स्टेडियमवर चाहत्यांना रोखण्यासाठी मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचं वृत्त चुकीचं आणि निराधार आहे. एमसीए भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करेल.”
“एमसीएनं रोहितला पाठिंबा देणाऱ्या किंवा हार्दिकला बूइंग करणाऱ्या लोकांच्या विरोधात सुरक्षेचे निर्देश दिल्याच्या अफवा आहेत. या चुकीच्या आणि निराधार बातम्या आहेत. अशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत”, असं एमसीएनं स्पष्ट केलं.
मुंबई आणि राजस्थान सामन्यासाठी एमसीए सुरक्षा वाढवणार असून स्टेडियममधील संपूर्ण सामन्यादरम्यान गर्दीवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं वृत्त ‘लोकमत टाइम्स’नं दिलं होतं. जर कोणी हार्दिक पांड्याला शिवीगाळ करताना किंवा थट्टा करताना सापडलं किंवा आढळलं तर त्याला स्टेडियममधून काढून टाकलं जाईल, असंही वृत्त होतं.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं 30 वर्षीय हार्दिक पांड्याची रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. हार्दिकचं अहमदाबाद आणि हैदराबादमधील मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रेक्षकांकडून जोरदार बूइंग झालं होतं.
अहमदाबाद आणि हैदराबाद येथे आयपीएल 2024 चे दोन सामने खेळल्यानंतर मुंबई इंडियन्स आता प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सचं चालू हंगामात अद्याप गुणांचं खातं उघडलेलं नाही. संघाचा गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोमांचक सामन्यात लखनऊचा पंजाबवर 21 धावांनी विजय, मयंक यादवनं पदार्पणातच घेतल्या 3 विकेट
सलग दोन षटकार अन् तिसऱ्या चेंडूवर चारी मुंड्या चीत! स्टॉइनिस विरुद्ध राहुल चहरचा जोरदार कमबॅक