-ओमकार मानकामे
१९३४च्या नव्याकोऱ्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर भारत संघाविरुद्ध खेळत असताना दुसऱ्या डावात मुंबई संघाची अवस्था होती ७०/५. ४६ धावांची आघाडी असली तरीही संघ अजून संकटात होता. मात्र इथून विजय मर्चंटच्या १२० धावा आणि वजिफदारच्या अष्टपैलू कामगिरीच्या (७१ धावा आणि ४० धावात ८ बळी) जोरावर मुंबईने पहिल्या रणजी जेतेपदावर आपले नाव कोरले.
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुंबईने अजून तीन रणजी ट्रॉफींची भर आपल्या कपाटात टाकली. अनेक विक्रम या संघाने नव्याने उभारले. विजय मर्चंट यांच्या महाराष्ट्रविरुद्ध ३५९ धावा आणि रुसी मोदीच्या एका सत्रातील (१९४४-४५) हजार धावा हे विशेष. मोदींचा १००८ धावांचा विक्रम मोडण्यासाठी अजून ४० वर्ष जावी लागली.
१९४७-४८ साली स्वतंत्र भारतातील पहिली रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळली गेली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई समोर उभा होता होळकर संस्थान संघ. सीके आणि सीएस नायुडू तसेच दत्ता गायकवाड यांच्या दमदार कामगिरीमुळे मुंबईला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील आपला पहिला पराभव झेलावा लागला.
पुढील वर्षीच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई आणि महाराष्ट्र. या भीमकाय संघांच्या स्पर्धेत पुण्याच्या मैदानावर पाऊस पडला तो धावांचा. त्याकाळी निकाल लागेपर्यंत सामना खेळायची प्रथा होती, गोलंदाजांना पिळून काढणारा हा सामना सलग सात दिवस चालला.
मुंबईच्या ६५१ धावांना उत्तर देत महाराष्ट्राने सर्वबाद ४०७ धावा केल्या. मुंबईने ७१४/८ अशी उत्तुंग धावसंख्या उभारली आणि महाराष्ट्राला जिंकण्यासाठी केवळ अशक्य असं ९५९ धावांचे लक्ष्य दिले. महाराष्ट्राने जिगरबाज पाठलाग करत उत्तरादाखल ६०४ धावा केल्या. एका सामन्यात झालेल्या २३७६ धावा हा आजही अबाधित विक्रम आहे.
अंतिम सामन्यात सुद्धा मुंबईने ६२० धावा करत रणजी ट्रॉफी जिंकली. १९४९च्या या विजयानंतर मुंबईला विजयश्रीसाठी पुढील पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली. १९५३-५४च्या सत्रात होळकर संघाला हरवत मुंबई संघाने पुन्हा एकदा जेतेपद मिळवलं.
या संघात आता बऱ्यापैकी नव्या चेहऱ्यांचं आगमन झालं होते. विनू मंकड सारखा जगज्जेता अष्टपैलू खेळाडू आता मुंबईकडे होता. १९५२साली याच मंकडने मद्रासला इंग्लंडविरुद्ध भारताला पहिलावाहिला कसोटी विजय मिळवून दिला होता.
१९५५-५६च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात मुंबई समोर उभा ठाकला होता बंगाल चा संघ. अशा वेळी १८-वर्षीय अष्टपैलू खेळाडू मनोहर हर्डीकरने केवळ ३९ धावात ८ बळी घेत बंगालचा खुर्दा उडवला. याच सामन्यात पॉली उम्रीगरने शतक झळकावत मुंबईची विजयश्री निश्चित केली. पुढे १९५६-५७ सत्रात सुद्धा मुंबई जेतेपद जिंकली.
पश्चिम विभागात मुंबईला टक्कर देणारा संघ म्हणजे बडोदे. १९५७-५८च्या सत्रात मुंबई आणि बडोदा यांनी आपले सर्व साखळी सामने जिंकले होते आणि या पश्चिम विभागातून एकच संघ पुढे जाणार होता. २१ डिसेंबर १९५७साली सोलापूरला मुंबई-बडोदा हा निर्णायक सामना झाला.
मुंबईने बडोद्याला पहिल्या डावात २४६ धावात गुंडाळले. उत्तरादाखल मात्र मुंबईला केवळ १९६ धावाच करता आल्या. बडोदाने दुसऱ्या डावात भक्कम फलंदाजी करत मुंबईला स्पर्धेतून बाहेर हाकललं. पुढे जाऊन बडोदा रणजी ट्रॉफी सुद्धा जिंकली.
हा पराभव कदाचित मुंबईच्या जिव्हारी लागला. कारण या सामन्यानंतर सुरु झालं मुंबई क्रिकेटमधील सुवर्णपर्व. १९५८नंतर पुढील पंधरा वर्ष मुंबई भारतीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. पराभव तर दूर, साधी धावांची आघाडी घेणं इतर संघाना अशक्यप्राय झालं. क्रिकेट विश्वात अभूतपूर्व अशी मक्तेदारी सुरु झाली.
कोण होते या सुवर्णकाळाचे शिलेदार? कोण कोणत्या प्रसंगांमधून हा संघ तावून सुलाखून निघाला? वाचूया पुढील भागात.
वाचा-
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा