fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

-ओमकार मानकामे (Twitter- @Oam_16 )

आर्थर गिलिगनच्या नेतृत्वाखाली MCCचा संघ १९२६मध्ये भारत दौऱ्यावर आला. देशात इतरत्र खेळून संघ तो मुंबईत आला तेव्हाही तो अविजीत होता. ३० नोव्हेंबर रोजी बॉम्बे जिमखान्यावर एमसीसी विरुद्ध हिंदू संघ असा दोन-दिवसांचा सामना खेळला गेला. पाहुण्यांनी या सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी केली.

गाय अर्ल नावाच्या इंग्लिश फलंदाजाने तुफान फलंदाजी करत भारतीयांच्या नजरेचे पारणे फेडले. जवळपास २५ हजार प्रेक्षकांसमोर त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकत १३० धावा काढल्या. अशी आतिषबाजी मुंबईच्या प्रेक्षकांनी आजतोवर पाहिली नव्हती. इंग्लिश संघ पहिल्या दिवसाखेरीस ३६३वर आटोपला तर हिंदू संघ १६/१ वर खेळत होता.

दुसऱ्या दिवशी कर्णधार विठ्ठल पळवणकर बाद झाल्यावर ८४/३ ला सी.के.नायुडू फलंदाजीला आले. मुरलेल्या इंग्लिश गोलंदाजांचा रस काढत सीकेनीं एकामागोमाग उत्तुंग षटकार खेचायला सुरुवात केली. नायूडूंचा झंझावात अखेरीस १५३ धावा काढून थांबला. यात त्यांनी १३ चौकार आणि ११ षटकार लगावले, एका डावातील ११ षटकार हे तेव्हा प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम होता.

या खेळीचे भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम झाले. इंग्लिश मनोवृत्तीला भारतीय क्रिकेटची पातळी उंचावली आहे हे समजून आले आणि भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीचा मार्ग मोकळा झाला. १९३०ला भारतात पहिली कसोटी (जी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या तीव्रतेमुळे खेळली गेली नाही) आणि मग १९३२ला इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा प्रस्ताव मांडला गेला.

१९३२ची लॉर्ड्स कसोटी खेळल्यानंतर डग्लस जार्डीनचा (बॉडीलाईन फेम) संघ भारतात आला. भारतातला पहिलावाहिला कसोटी सामना खेळला गेला तो ही मुंबईच्या बॉम्बे जिमखानाच्या मैदानावर. १५ डिसेम्बर १९३३ रोजी हा सामना सुरु झाला, भारताचे कर्णधार होते अर्थातच सीके नायुडू.

भारताने पहिली फलंदाजी करत २१९ धावा केल्या, यात लाला अमरनाथने सर्वाधिक योगदान देत ३८ धावा जोडल्या. मोहम्मद निसारने ९०/५ घेऊन सुद्धा इंग्लिश संघाने ४३८ धावांचा डोंगर उभारला. या डावाचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची अवस्था २१/२ अशी झाली होती.

यानंतर नायुडू आणि अमरनाथ यांनी डाव सावरला आणि धावसंख्या २०७पर्यंत पोहचवली. लाला अमरनाथने आपल्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावत भारताचा पहिला कसोटी शतकवीर होण्याचा मान पटकावला. अमरनाथच्या ११८ धावांचे कौतुक अक्ख्या देशाला होते आणि रातोरात तो देशाच्या गळ्यातला ताईत बनला. हे सुवर्ण क्षण बॉम्बे जिमखान्याने जगलेत.

मुंबई कसोटी भारत हरला असला क्रिकेटने देशात अतोनात लोकप्रियता मिळवली. १९३४-३५ला संपूर्ण देशाचा अंतर्भाव असणारी ‘रणजी ट्रॉफी’ सुरु झाली आणि त्यामुळेच गेले काही वर्ष बंद पडलेली मुंबईची चौरंगी स्पर्धा पुन्हा चालू करण्याचा विचार पुढे आला.

१९३५च्या चौरंगी स्पर्धेनंतर इतर जातीच्या लोकांना सामावून घेणारा एक ‘इतर’ संघ असावा अशी मागणी पुढे आली. मुंबईत १९३७ला गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पहिले क्रिकेट स्टेडियम ‘ब्रेबॉर्न स्टेडियम’ स्थापन केले गेले. याच मैदानावर पहिली पंचरंगी स्पर्धा (ब्रिटिश, हिंदू, मुसलमान,पारशी आणि इतर) खेळण्याचे निश्चित केले गेले.

ब्रेबॉर्नवरील तिकीट संख्येच्या वादावरून हिंदू संघाने १९३७च्या स्पर्धेत भाग घेतला नाही. पुढील वर्षांपासून मात्र पंचरंगी स्पर्धा नियमितपणे खेळली जाऊ लागली. कालांतराने भारतीय राजकारणातील धर्माधीष्ठीत मुद्द्यावरून पंचरंगी स्पर्धा पुढे कोलमडू लागली. हळूहळू समाजाच्या सर्व भागातून तिला विरोध होऊ लागला आणि १९४६पर्यंत ही स्पर्धा पूर्णपणे बंद झाली.

१९४७पासून रणजी स्पर्धेने भारतीय क्रिकेटमध्ये प्रमुख स्थान मिळवले आणि मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील नवा अध्याय सुरु झाला.

महत्त्वाचे- मुंबई क्रिकेट सफरनामा या मालिकेतील पुढील भाग शनिवारी सकाळी ७ वाजून ३० मिनीटांनी

वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

You might also like