आयपीएल २०२१ ला म्हणजेच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून सगळे संघ देखील या हंगामासाठी जोरदार तयारी करण्यात गुंतले आहेत. अशातच चाहत्यांनी कोणता संघ यात बाजी मारणार, यावर तर्क लावायला सुरुवात केली आहे.
यात आता भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी देखील उडी मारली आहे. त्यांनी यंदाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कोणता संघ असेल, हे नुकतेच स्पष्ट केले.
गतविजेत्यांनाच पुन्हा प्रबळ संधी
मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे आयपीएलचा हंगाम युएई मध्ये आयोजित करण्यात आला होता. या हंगामात मुंबई इंडियन्स वर्चस्व गाजवत विक्रमी पाचवे विजेतेपद पटकाविले होते. यंदा देखील त्यांनाच विजेतेपदाची सर्वाधिक संधी असल्याचा दावा गावसकर यांनी केला. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीशी चर्चा करतांना त्यांनी हे मत मांडले.
खेळाडू आहेत फॉर्मात
मुंबई इंडियन्सला यंदा विजेतेपदाची सर्वाधिक संधी असल्या मागील कारण विशद करतांना गावसकर म्हणाले, “मुंबईचा संघ अतिशय मजबूत आहे. त्यांच्याकडे तगडे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हरवणे कठीण आहे. मुख्य म्हणजे त्यांचे अधिकांश खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांच्या इंग्लंडविरुद्धच्या प्रदर्शनाने ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.”
हार्दिकच्या पुनरागमनाने मुंबई मजबूत
गावस्कर यांच्या मते हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात ज्या पद्धतीने ९ षटके गोलंदाजी केली, ते मुंबई इंडियन्ससाठी शुभसंकेत होते. ते म्हणाले, “ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहचा समावेश असल्याने मुंबईचे गोलंदाजी आक्रमण धारदार आहेच. त्यात आता हार्दिक पंड्या पुन्हा एकदा गोलंदाजी करू लागल्याने मुंबईचा फायदा होणार आहे. त्याची गोलंदाजी मुंबई इंडियन्स साठी यंदाच्या आयपीएल मध्ये बोनस म्हणून सिद्ध होऊ शकते.”
याच सगळया कारणांमुळे यंदाच्या आयपीएल मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सलाच विजेतेपद पटकावण्याची संधी असेल, असे गावसकर यांचे म्हणणे होते. आता त्यांचा हा अंदाज खरा ठरणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई इंडियन्ससह या तीन बलाढ्य टीम्सला मोठा धक्का, चार खेळाडू पहिल्या काही सामन्यातून बाहेर
तर सचिन-गांगुली भारतीय संघात दिसलेच नसते, पाहा विरेंद्र सेहवगाने कुणावर साधलाय निशाणा
आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला अशा दिल्या शुभेच्छा