आयपीएल 2021 चा नववा सामना रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्याकरीता मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंन्ट बोल्ट आणि फिरकीपटू राहुल चाहरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना रोहित शर्माने या विजयाचे श्रेय संघातील दोन खेळाडूंना दिले.
या स्पर्धेतील सलग दुसर्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना म्हणाला की, “या सामन्यात गोलंदाजांकडून खूप चांगली कामगिरी पहायला मिळाली. आपल्याला माहितीच आहे की, या खेळपट्टीवरती शानदार गोलंदाजी करणे सोपे नसते.”
“तसेच या खेळपट्टीवर आम्ही केलेली धावसंख्या ही बर्यापैकी चांगली असल्याचे मला वाटले. जर आपण दोन्ही संघांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर दोन्हीही संघ पॉवरप्लेमध्ये धावा करण्याचा प्रयत्न करीत होते. याआधी पण मी म्हटले होते की, मधल्या षटकांत आम्ही चांगली फलंदाजी करू शकतो. कारण संघातील खेळाडूंनी अशा खेळपट्ट्यांवर बरेच क्रिकेट खेळले आहे. परंतु काही क्षेत्रे अशी आहेत ज्यावर आपल्याला कार्य करणे आवश्यक आहे. तसेच या लोकांवर मी फार कठोरही होऊ इच्छित नाही. कारण मला वाटते की वेळेनुसार खेळपट्टीची गती हळू होत चालली होती,” असे रोहित पुढे म्हणाला.
पुढे राहुल चहर आणि पोलार्डचे कौतुक करताना तो म्हणाला की, “राहुल आपल्या चौथ्या षटकात चेंडूला वळण देत होता आणि हे सहसा मुंबईतील खेळपट्टीवर जमत नाही. चेंडू रिव्हर्स देखील चांगल्या प्रकारे होत होता. त्यामध्ये खेळपट्टीच्या कमी गतीमुळे फलंदाजाला पुढे येऊन सरळ फटके मारता येत नव्हते. अशा वेळी आपल्याकडे लयबद्ध फलंदाजाची आवश्यकता असते. यासाठी अनेक वर्षांपासून पोलार्डने ही भूमिका बजावली आहे. त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याचे फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उपस्थित असणे खूप महत्वाचे आहे. या सामन्यात आमचे क्षेत्ररक्षणही खूप चांगले होते. त्यामुळे याचाही आम्हाला खूप अभिमान आहे.”
सामन्यातील मुंबई इंडियन्सच्या सलग दुसर्या विजयाबद्दल सांगायचे झाले तर, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकच्या 40 धावा, कर्णधार रोहित शर्माच्या 32 धावा आणि अष्टपैलू कायरन पोलार्डच्या 35 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून एकूण 150 धावा केल्या. तर हैदराबादकडून गोलंदाजीत मुजीब रहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले.
दुसर्या डावात हैदराबादकडून लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची विस्फोटक खेळी केली. तर याशिवाय कर्णधार वॉर्नरनेही 36 धावा केल्या. पण राहुल चाहर आणि ट्रेंटच्या शानदार गोलंदाजीसमोर हैदराबाद संघाने पूर्णपणे हार मानली. राहुल चहरने 4 षटकांत केवळ 19 धावा देऊन 3 गडी बाद केले. तर त्याचवेळी ट्रेंट बोल्टनेही 3..4 षटकांत 28 धावा देऊन 3 बळी घेत मुंबईला 13 धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ अविश्वसनीय! एकाच सामन्यात हार्दिकचे दोन जबरदस्त रनआऊट, पाहा व्हिडिओ