अबू धाबी| आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. या दोन्ही संघांनी या हंगामात खेळलेल्या आपल्या तीन सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे.
या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड म्हणाला की, या सामन्यात त्याच्या संघाचे लक्ष्य पंजाबचा कर्णधार केएल राहुल असेल. सध्याच्या आयपीएलमध्ये पंजाबचे सलामीवीर राहुल आणि मयंक अगरवाल यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.
गोलंदाजांची होणार बैठक
योजनेबद्दल बोलताना बॉन्ड म्हणाला, “ राहुलने गेल्या काही हंगामात आमच्या संघाविरुद्ध बऱ्याच धावा केल्या आहेत. तो एक उत्तम खेळाडू आहे. तो मैदानात चौफेर फटकेबाजी करतो. आम्ही दुपारी गोलंदाजांची बैठक घेत आहोत. ज्यामध्ये आम्ही पंजाबच्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंविरूद्ध योजना कशी करायची याबद्दल बोलू.”
विशेष योजना करू तयार
“आम्हाला हे देखील माहित आहे की राहुल फलंदाजी करताना सुरुवातीला थोडा वेळ घेतो, म्हणून त्याच्यावर आणि त्याच्याबरोबर खेळत असलेल्या फलंदाजावर दबाव आणण्याची ही चांगली संधी असू शकते. ज्या क्षेत्रात तो खूप मजबूत आहे, त्या क्षेत्रात आम्ही त्याला धावा करू देणार नाही. तो कव्हरवरून उत्तम फटके मारतो. पायात फेकलेला चेंडूही तो चांगल्याप्रकारे खेळतो. त्याला बाद करण्यासाठी आम्ही एक विशेष योजना तयार करू.” असेही पुढे बोलताना बॉन्ड म्हणाला
गोलंदाजांनी दबाव आणला पाहिजे
संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी विभागात पंजाबच्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर दबाव आणला पाहिजे. परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या दोन मुख्य फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट खेळ दाखविला आहे. जर गोलंदाजांनी थोडा दबाव टाकला आणि या मुख्य फलंदाजांना लवकर बाद केले तर आम्ही त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकतो.”