आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ समोरासमोर आले. मुंबईने या सामन्यात लखनऊ संघाला अक्षरशः नामोहरम करत 81 धावांनी दणदणीत विजय साकारला. आता क्वालिफायर दोनमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. मुंबईच्या या विजयाचा शिल्पकार युवा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल हा ठरला. त्याने तुफानी गोलंदाजी करताना पाच फलंदाजांना बाद केले. त्याचवेळी सामन्यानंतर बोलताना त्याने केलेला एका वक्तव्यामुळे सर्वांची मने जिंकण्यात तो यशस्वी ठरला.
लखनऊ संघ क्वालिफायरच्या उद्देशाने या सामन्यात उतरला होता. मात्र, आकाश याने सुरुवातीपासूनच त्यांच्या संघाला हादरे देण्यास सुरुवात केली. त्याने आधी सलामीवीर प्रेरक मंकडला बाद केले. त्यानंतर आयुष बदोनी व निकोलस पूरन यांना लागोपाठच्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रवी बिश्नोई व मोहसीन खान यांना बाद करत त्याने लखनऊचा डाव संपुष्टात आणला. त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना केवळ 5 धावा देत पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. आयपीएल प्ले ऑफ्स इतिहासातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
आकाशच्या गोलंदाजीत यॉर्कर हे महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यामुळे अनेक जण त्याची तुलना जसप्रीत बुमराह याच्याशी करताना दिसतायेत. मात्र, स्वतः आकाश याबाबत बोलताना म्हणाला,
“जसप्रीतशी माझी तुलना होऊ शकत नाही. त्याचा दर्जा वेगळा आहे आणि माझा वेगळा. मला माझी तुलना कोणाशीही केलेली आवडणार नाही. पुढच्या काळात मी आणखी चांगली गोलंदाजी करून मुंबईच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करेल.”
यावर्षी आकाश मधवाल प्रथमच आयपीएल खेळताना दिसत आहे. उत्तराखंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आकाशने 2019 मध्ये आरसीबीसाठी नेट बॉलर म्हणून देखील भूमिका बजावलेली. त्यानंतर तो मुंबई इंडियन्ससाठी नेेटबॉलर म्हणून आला. त्यानंतर त्याला थेट आयपीएल खेळण्याची संधी देण्यात आली.
(Mumbai Indians Pacer Akash Madhwal Said Don’t Compare Me With Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुट्टी नाही! लखनऊ पराभूत होताच मुंबईच्या खेळाडूंनी उडवली नवीनची खिल्ली, सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड