वादळी वारे व जोराच्या पावसामुळे नवी मुंबईमधील नेरुळ येथे असलेल्या डॉ. डीवाय पाटील स्टेडियमचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शहरातील सर्वात मोठे स्टेडियम (आसन क्षमता) म्हणून डीवाय पाटील स्टेडियमची ओळख आहे.
नवी मुंबईचे कमिशनर संजय कुमार यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. “एका आयकॉनिक स्टेडियमटे मोठे नुकसान,” असा ट्विट त्यांनी केला आहे.
Huge Damage to one of iconic stadiums DY Patil stadium pic.twitter.com/9ILWJKGYNr
— Sanjay Kumar ; Rtd IPS , DGP( Training ) MS (@sanjayips89) August 5, 2020
स्टेडियमचे आऊटर रेलिंग्ज व रुट टॉपटचे यात मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यात ते थेट रस्त्यावर पडले आहेत.
डॉ. डीवाय पाटील स्टेडियम हे विविध क्रीडा स्पर्धांसाठी वापरले जाणारे मल्टिपर्पज स्टेडियम असून ते डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकॅडमीचा भाग आहे. यावर क्रिकेट, फूटबॉल, टेनिस, बॅडमिंटन व स्विमिंगच्या सुविधा उपलब्ध आहे.
५५ हजार प्रेक्षक बसू शकतील, एवढी मोठी या स्टेडियमची क्षमता असून ते मुंबईतील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम समजले जाते. २००८ ते २०१० या काळात ते आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे होम ग्राऊंड होते. याचबरोबर या स्टेडियमवर आयएसएल या फूटबॉल लीगमधील मुंबई सीटीचे सामनेही झाले आहेत.
२००९ साली या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार होता. परंतू पावसामुळे तो रद्द झाला व मुंबईतील चौथ्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. परंतू येथे फिफा अंडर १७ विश्वचषकाचे काही सामने झाले होते.
मार्च २००८मध्ये या स्टेडियमचे उद्धाटन झाले होते. त्यानंतर लगेच येथे आयपीएलचे सामने झाले. २०११ विश्वचषकासाठी वानखेडे स्टेडियमचे बांधकाम सुरु असल्याचे तेव्हा या स्टेडियमच्या पथ्यावर पडले होते.
२००८ च्या आयपीएलचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्सने येथेच जिंकत पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर २०१०मध्ये येथे चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत ट्रॉफी जिंकली होती.