भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी खेळवली जात आहे. या सामन्याचे साखळी सामने संपले असून आता बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आज त्याअंतर्गत खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईने सौराष्ट्रवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले. कर्णधार पृथ्वी शाॅचे वादळी शतक या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
पृथ्वीचे तुफानी शतक
दिल्लीच्या पालम स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सौराष्ट्रने दिलेले २८५ धावांचे लक्ष्य मुंबईच्या डावाच्या सुरुवातीला आव्हानात्मक वाटत होते. विशेषतः सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईच्या फलंदाजी फळीला हे लक्ष्य पेलेल का, याबाबत साशंकता होती. मात्र पृथ्वीने आपल्या जबरदस्त खेळीने या सगळ्या शंका-कुशकांना पूर्णविराम दिला.
पृथ्वीने १२३ चेंडूत १८५ धावांची खेळी उभारताना सौराष्ट्राच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्याने यशस्वी जयस्वालसह पहिल्या गड्यासाठी २३८ धावांची भागीदारी केली. हीच जोडी आता विजयावर शिक्कामोर्तब असे वाटत असतांनाच यशस्वी जयस्वाल मात्र वैयक्तिक ७५ धावांवर जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आदित्य तरेने २४ चेंडूत २० धावांची खेळी करत पृथ्वीला साथ दिली. त्यामुळे या दोघांनी ४१.५ षटकातच निर्धारित लक्ष्य गाठत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
मुंबईचा शिस्तबद्ध मारा
तत्पूर्वी या सामन्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५८ धावांची सलामी मिळालेल्या सौराष्ट्रने त्यानंतर मात्र २५ धावांच्या अंतराने ३ गडी गमावले. त्यानंतर देखील छोट्या दोन भागीदार्यांनंतर त्यांची ५ बाद ११५ अशी अवस्था झाली होती.
मात्र समर्थ व्यासने त्यानंतर चिराग जानीसह अभेद्य भागीदारी करत निर्धारित ५० षटकात संघाला २८४ धावांची मजल मारून दिली. समर्थ व्यासने नाबाद ९० धावांची तर चिराग जानीने नाबाद ५३ धावांची खेळी उभारली. मुंबईकडून शाम्स मुलानीने २ तर शिवम दुबे, तनुष कोटीअन आणि प्रशांत सोळंकी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
महत्वाच्या बातम्या:
चेसमास्टर स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे
अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय
ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर