भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर मुरली विजय याने सोमवारी (30 जानेवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबाबतची माहिती दिली. आपल्या कारकिर्दी दरम्यान सहयोग करणाऱ्या कुटुंब, मित्रपरिवार व चाहत्यांचे त्याने आभार मानले. आयुष्यात आता एक नवी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील त्याने या पत्रकात म्हटले.
@BCCI @TNCACricket @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/ri8CCPzzWK
— Murali Vijay (@mvj888) January 30, 2023
मागील काही दिवसांपासून मुरली विजय भारतीय क्रिकेट सोबतचे आपले संबंध तोडणार अशी चर्चा सुरू होती. त्याने नुकतेच आपल्याला सहभागी संधी दिली न गेल्याचे देखील म्हटलेले. त्यानंतर आता त्याने थेट निवृत्ती घेत भारतीय क्रिकेट सोबतचा आपला प्रवास थांबवला आहे. सोशल मीडियावर एक निवेदन देत त्याने ही घोषणा केली.
त्याने लिहिले, ‘मी अत्यंत कृतज्ञ भावनेने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2002 ते 2018 या काळात मी जे क्रिकेट खेळलो ते दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. या संपूर्ण प्रवासात मला संधी देणाऱ्या बीसीसीआय, तमिळनाडू क्रिकेट संघटना, चेन्नई सुपर किंग्स व इतर सर्व संघांचे आभार. तसेच, माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांनाही धन्यवाद. आयुष्यात आता एक नवीन सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. आणखी काही काळ क्रिकेटसोबत जोडून राहण्याचा माझा प्रयत्न असेल.’
मुरली विजय याचे भारतीय क्रिकेट सोबतचे संबंध संपल्याने तो आता काही व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याने भारतीय संघासाठी 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 3982, 339 व 169 धावा जमा आहेत. भारताने जिंकलेल्या 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी तो संघाचा सदस्य होता. यासोबतच तो अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग राहिला. चेन्नईसाठी सलामीवीर म्हणून त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा देखील सदस्य होता. त्याला पंजाब संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली.
(Murali Vijay has announced his retirement from international cricket)