देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या फलंदाज मुशीर खानचा शुक्रवारी (27 सप्टेंबर) उत्तर प्रदेशमध्ये कार अपघात झाला. त्याला जखमी अवस्थेत लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
इराणी चषकाचा सामना रेस्ट ऑफ इंडिया (ROI) आणि मुंबई यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होईल. 19 वर्षीय मुशीर या सामन्यासाठी आझमगढहून लखनऊला जात होता. वाटेत त्याचा अपघात झाला. आता हॉस्पिटलनं मुशीरच्या अपघातासंदर्भात पहिलं अधिकृत विधान जारी केलं आहे. मुशीर सध्या धोक्याबाहेर आहे.
“मुशीर खानचा 27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. त्याला मानेच्या समस्येमुळे मेदांता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आलं होतं”, असं हॉस्पिटलनं शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ.धर्मेंद्र सिंग यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तो धोक्याबाहेर आहे”, असं हॉस्पिटलनं स्पष्ट केलं.
मुशीर खान क्रिकेटच्या मैदानावर कधी पुनरागमन करेल हे अद्याप स्पष्ट नाही. तो पूर्ण बरा होण्यासाठी किमान 16 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. मुशीरची दुखापत हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. तो इराणी कप नंतर 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळणार होता. मात्र तो आता रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर पडू शकतो.
मुशीर खान अलीकडेच दुलीप ट्रॉफीमध्ये 181 धावांची इनिंग खेळून चर्चेत आला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यानं 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.14 च्या सरासरीनं 716 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय त्यानं आठ विकेट्सही घेतल्या आहेत. मुशीर खाननं अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही चमकदार कामगिरी केली होती.
हेही वाचा –
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ