भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सांगण्यावरून कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आपल्या संघातून बाहेर काढले होते. आयपीएल लिलावात केकेआरने रहमानला ९.२ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, आता रहमानला पाकिस्तानातून नवी डील मिळाली असून त्याला कोट्यवधी रुपयांमध्ये साइन करण्यात आले आहे.
मुस्तफिजुर रहमानला लाहोर कलंदर्सने ‘पीएसएल २०२६’ साठी थेट आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. त्याला ६.४४ कोटी पाकिस्तानी रुपये (सुमारे २,३०,००० अमेरिकन डॉलर्स) मध्ये साइन केले गेले आहे. कलंदर्ससोबत रहमानचा हा तिसरा कार्यकाळ असेल. यापूर्वी तो लाहोरसाठी तीन सीझन खेळला आहे. २०१६ च्या सीझनसाठी रहमानची पहिल्यांदा निवड झाली होती, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. २०१८ मध्ये त्याने पाच सामने खेळले आणि ६.४३ च्या इकॉनॉमीने चार विकेट घेतल्या. आगामी सीझनसाठी लाहोरने शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफीक, सिकंदर रझा आणि मोहम्मद नईम यांना संघात कायम (रिटेन) ठेवले आहे.
कलंदर्सचे मालक समीन राणा यांनी रहमानच्या संघात पुनरागमन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “एकदा कलंदर, नेहमीच कलंदर. मुस्तफिजुर हा फक्त एक खेळाडू नाही, तर तो एक भाऊ आहे आणि आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो कधीच वेगळा झाला नाही. त्याचे आमच्या ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्याची प्रतिभा, अनुभव आणि समर्पण अमूल्य ठरेल, कारण आमचे लक्ष्य आमच्या विजेतेपदाचे रक्षण करणे आणि पीएसएल ११ मध्ये आपली छाप पाडणे हे आहे.”
मुस्तफिजुर रहमानने १५ कसोटी सामन्यात ३१ विकेट घेतल्या आहेत, तर ११६ एकदिवसीय सामन्यात त्याने १७७ बळी घेतले आहेत. याशिवाय १२६ टी-२० सामन्यात त्याने १५८ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या ६० सामन्यांमध्ये त्याने ६५ फलंदाजांना बाद केले आहे.






