लाॅकडाऊनमध्ये अनेक क्रिकेटपटू सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक लाईव्ह सेशनमध्ये भाग घेत आहेत परंतु जबरदस्त सोशल मिडीया फॅन फाॅलोवर्स असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मात्र सोशल मिडियापासून पुर्णपणे दुर आहे.
सर्वात जास्त चाहते लाभलेल्या या क्रिकेटपटूच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी एकतर त्याच्या पत्नी किंवा मुलीच्या सोशल मिडीयावरुनच चाहत्यांना समजतात.
अशातच त्याची पत्नी साक्षी सिंग धोनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनीची दाढी पुर्ण सफेद झालेली दिसली. यावर चाहत्यांनी सोशल मिडीयावर अनेक कमेंट्सही केल्या.
आता bdcrictime या वेबसाईटनुसार धोनीच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्याचा फोटो पाहिला आहे परंतु त्याचे नक्कीच तेवढे वय झाले नाही. आईसाठी मुलाचे कधीही वय होतं नाही,” असे यावेळी धोनीची आई म्हणाली.
“मला माहित नाही, तो टी२० विश्वचषक खेळेल की नाही. पहिले कोरोना व्हायरसचा प्रकोप संपु द्या. तो त्याचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, ” अशीही त्याची आई पुुढे म्हणाली.