श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बांगलादेशचा कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतोने राजीनामा दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) नव्या सायकलमधील पहिल्या कसोटी मालिकेत कोलंबोमध्ये श्रीलंकेकडून एक डाव 78 धावांनी पराभव झाल्यानंतर शनिवारी शांतोने कसोटी संघाच्या नेतृत्वावरून पायउतार होण्याची घोषणा केली.
“मला कसोटी संघाचे नेतृत्व पुढे चालू ठेवायचे नाही,” असं शांतोने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. “हा निर्णय भावनिक नाही. संघाच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे,” असेही त्याने स्पष्ट केले. तीन फॉर्मेटसाठी तीन वेगळे कर्णधार असणं संघासाठी कठीण ठरू शकते, हेही तो म्हणाला.
या मालिकेच्या पहिल्या कसोटीत शांतोने जबरदस्त कामगिरी केली होती. गॅले येथे झालेल्या पावसामुळे प्रभावित झालेल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत शतकं झळकावली होती. एकाच कसोटीत दोन शतकं करणारा तो चौथा बांगलादेशी कर्णधार ठरला. मालिकेत एकूण 300 धावा करत त्याने बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा केल्या.
दुसऱ्या कसोटीत मात्र बांगलादेशची कामगिरी अपयशी ठरली. पहिल्या डावात त्यांनी 247 धावा केल्या, पण त्यानंतर श्रीलंकेने पथुम निशांका (158) च्या शतकाच्या जोरावर 458 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव केवळ 133 धावांत आटोपला. श्रीलंकेच्या फिरकीपटू प्रबाथ जयसूरियाने दुसऱ्या डावात 5 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.
शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने नोव्हेंबर 2023 पासून 14 कसोटीत सहभाग घेतला, त्यात 4 विजय, 1 बरोबरी आणि 9 पराभव अशी कामगिरी झाली. पाकिस्तानविरुद्ध ऑगस्ट 2024 मध्ये मिळवलेली दोन कसोटी विजय ही त्याच्या कर्णधारपदातील ठळक कामगिरी ठरली. कर्णधार म्हणून त्याचा फलंदाज म्हणून सरासरी 36.24 इतकी होती, जी कर्णधार नसताना 29.83 इतकी होती.
जून महिन्यात त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून मेहदी हसन मिराझकडे सोपवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कसोटी नेतृत्वही त्याने सोडले आहे.
“कोणीही हा निर्णय भावनावश आहे असं समजू नये. मी कुठल्या वैयक्तिक नाराजीनं हा निर्णय घेतलेला नाही. संघाच्या भविष्यासाठी, संघाच्या समन्वयासाठी आणि स्थिरतेसाठी हा निर्णय घेतला आहे,” असंही शांतोने स्पष्ट केलं.