काही दिवसांपुर्वीच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यातील टी२० आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजयी पताका झळकावली होती. भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अविस्मरणीय ठरला. कारण याच दौऱ्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वात नटराजनचे वनडे, टी२० आणि कसोटी पदार्पण झाले. यानंतर नटराजनने विराटविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ ने मात केली होती. या पराभवाचा वचपा भारतीय संघाने टी२० मालिकेत विजयी पताका झळकावत काढला होता. ३ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारताने विजय मिळवला होता. अखेरचा तिसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मात्र शेवटी ट्रॉफीवर भारतीय संघाचेच नाव कोरले गेले.
या टी२० मालिकेदरम्यान नटराजनने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करत एकूण ६ विकेट्स काढल्या होत्या. त्याच्या या कामगिरीची प्रशंसा कर्णधार विराटने त्याला ट्रॉफी देत केली होती.
यासंदर्भात बोलताना नटराजन म्हणाला की, “मी अपेक्षा केली नव्हती की विराट कोहली माझ्याजवळ येईल आणि ट्रॉफी माझ्या हातात सोपवेल. मी सर्व भारतीय खेळाडूंमध्ये एका बाजूला उभा राहिलो होतो. पण विराटने माझ्याकडे येऊन स्वत: माझ्या हातात ट्रॉफी दिली आणि माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. विराटसारख्या दिग्गजाने स्वत: माझा इतका सन्मान केला. यावेळच्या माझ्या मनातील भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.”
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1353711723275038725?s=20
विराट-रहाणेच्या नेतृत्त्वाची केली प्रशंसा
“कोणत्याही खेळाडूसाठी कोहली आणि रहाणे सारख्या कर्णधारांच्या छत्रछायेखाली पदार्पण करणे ही खूप भाग्याची गोष्ट असते. दोघांनीही माझे पदार्पण झाल्यानंतर मला व्यवस्थितपणे सांभाळून घेतले. मला त्यांच्या नेतृत्त्वाखाली बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी मला प्रेरित करण्याचेही काम केले. कोहली आणि रहाणे हे दोघेही उत्कृष्ट कर्णधार आहेत. मला त्यांच्या नेतृत्त्वाखाली खेळून खूप चांगले वाटले”, या शब्दात नटराजनने विराट आणि रहाणेची प्रशंसा केली.
भारतीय संघात संधी मिळण्याची अपेक्षा नव्हती- नटराजन
पुढे बोलताना नटराजन म्हणाला की, “मी एक नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो. मला अपेक्षा नव्हती की, मला भारताकडून एवढ्या लवकर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. परंतु जेव्हा मला सांगण्यात आले की, मला वनडे संघात स्थान मिळाले आहे. त्यानंतर मी खूप दबावात आलो होतो. परंतु मला संधीचा लाभ घ्यायचा होता. त्यामुळे मी धैर्याने मैदानावर उतरलो. यावेळी आमचे संघ प्रशिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी माझे समर्थन केले आणि मला खूप प्रोत्साहित देखील केले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एवढे यश साध्य करू शकलो आहे.”
नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी
नटराजन हा आयपीएल २०२०चा भाग होता. यादरम्यान नटराजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आपली भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मायदेशी परतू शकला नाही. पुढे मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातून नटराजनने वनडे पदार्पण केले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर टी२० पदार्पण करत नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी२० सामने खेळले. यादरम्यान दमदार कामगिरी करत त्याने ६ विकेट्स चटकावल्या. एवढेच नव्हे तर, ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रहाणेने त्याची अंतिम ११ जणांच्या पथकात निवड केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण करत नटराजनने ४ विकेट्सची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज
कोहली का रहाणे, कोण आहे टीम इंडियाचा उत्कृष्ट कर्णधार?, टी नटराजनने सांगितलं नाव
“मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद देशाकडून खेळण्यात होता”, टी नटराजनचं मन जिंकणार वक्तव्य






