पुणे। आर्मी रोइंग नोड येथे संपन्न झालेल्या ४१व्या राष्ट्रीय ज्युनियर रोईंग स्पर्धेत बॉईज स्पोर्टस संघाने अपेक्षित वर्चस्व राखले. त्यांनी ३ सुवर्ण, १ रौप्य अशी चार पदके मिळवू सर्वाधिक १८ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी संतोष उल्लाळ, रामचंद्र राव, निरंजन किर्लोस्कर, विजय छेड्डा, सुहास लुंकड, विजय शिर्के, राजन केळकर, महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर , सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी उपस्थित होते.
महिला गटात बाजी मारणाऱ्या केरळाने २ सुवर्ण आणि ३ ब्रॉंझ अशा एकूण ५ पदकांसह १३ गुणांसह दुसरे स्थान मिळविले. मध्य प्रदेश संघाचेही १३ गुण झाले होते. मात्र,केरळाची पदकसंख्य अधिक राहिल्याने त्यांना दुसरा क्रमांक देण्यात आला. मध्य प्रदेशाने २ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले.
यजमान महाराष्ट्राच्या पदरी अपयशच पडले. त्यांना २१ संघांत १८व्या स्थानी समाधानी मानावे लागले होते. महाराष्ट्राने तीन गटात मानांकन निश्चित करणाऱ्या ब अंतिम फेरी गाठली होती. हेच काय ते त्यांच्यासाठी विशेष ठरले. स्पर्धेत सहभागी २१ पैकी दहा राज्य संघांनी किमान एक तरी पदक मिळविले.
बॉईज स्पोर्टस संघाला पहिले सुवर्णपदक गौरव कुमार याने मिळवून दिले. त्याने १००० मीटरची शर्यत ३.२७.३१ सेकंद अशी वेळ देत जिंकली. हरियाणाचा लक्ष रौप्य, तर ओडिशाचा शोभित पांड्ये ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.
डबल स्कल प्रकारात बॉईज स्पोर्टसने दुसरे सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या निखिल कुमार आणि अक्षय नैन या जोडीने मध्य प्रदेशाच्या गोपाळ ठाकूर आणि प्रभाकर राजावत या जोडीवर दोन मिनिटांची आघाडी घेत सुवर्णपदक पटकावले. बॉईज स्पोर्टंस जोडीने ३.११.५३ सेकंद अशी वेळ दिली. मध्यप्रदेशाच्या खेळाडूनी ३.१३.३४ सेकंद इतक्या वेळेने अंतिम रेषा गाठली.
मुलांच्याच कॉक्सलेस फोर प्रकारात बॉईजने तिसरे सुवर्णपदक पटकावले. रविंदर, सतिश यादव, निशांत पिलानिया, सतेंद्र चौहान या चौघांनी ३.०१.४३ सेकंद वेळ दिली. हरयानाच्या रवी, विशाल अंकित, राहुल या चौघांनी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केरळला ब्रॉंझपदक मिळाले.
महिला विभागात केरळने वर्चस्व राखले. त्यांना जोडी आणि कॉक्सलेस फोर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आर्या नायर आणि व्ही. जे. अरुंधती यांनी ३.५९.३० सेकंद वेळ देताना ही सोनेरी कामगिरी केली. मणिपूर रौप्य,तर पंजाब ब्रॉंझपदाचे मानकरी ठरले. ए. आर्चा, बी. विनामोल, अलिना ऍन्तो आणि व्ही.एस. मिनाक्षी यांनी केरळला कॉक्सलेस ४ या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. या चौघीनी ३.२९ मिनिट अशी वेळ दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या, गेल्या ४ महिन्यांतील चक्क चौथी घटना
वरिष्ठ गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल: पुणे ब संघाला विजेतेपद, स्वप्नील गदादे सर्वोत्तम खेळाडू