टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी सोनेरी दिवस होता. कारण एकीकडे नीरज चोप्राने देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले, तर दुसरीकडे पैलवान बजरंग पुनियाने कांस्यपदक पटकावले आहे. यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राचे चहुबाजूंनी कौतुक होत आहे. अशात टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने आपली ऐतिहासिक कामगिरी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केली आहे.
‘फ्लाइंग शीख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचे याच वर्षी जूनमध्ये कोरोनामुळे निधन झाले आहे. भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर चोप्रा म्हणाला की, ‘मिल्खा सिंग यांना ऑलिम्पिकच्या स्टेडियममध्ये भारताचे राष्ट्रगीत ऐकायचे होते. ते आता या जगात नाहीत. पण त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.’
मिल्खा सिंगचा मुलगा झाला भावूक
सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राकडून मिळालेल्या या सन्मानामुळे मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि स्टार गोल्फपटू जीव मिल्खा सिंह भावुक झाले आहेत. त्यांनी त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत लिहिले की, ‘बाबा या क्षणाची वर्षानुवर्षे याची वाट पाहत होते. एथलेटिक्समधील पहिल्या सुवर्ण पदकासह त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. हे ट्विट करताना मला रडू येत आहे. मला खात्री आहे की माझ्या वडिलांच्या डोळ्यातही अश्रू आले असतील. हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल धन्यवाद.’
त्यांनी पुढे लिहिले की, ‘तुम्ही केवळ ऑलिम्पिक खेळांमध्ये देशातील पहिले एथलेटिक्स सुवर्ण पदक जिंकले नाही, तुम्ही ते माझ्या वडिलांना समर्पित केले आहे. मिल्खा कुटुंब या सन्मानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे.’
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके मिळवली
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताने ७ पदके जिंकली आहेत. भारताने १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक आणि ४ कांस्य पदकांसह ऑलिम्पिक पूर्ण केले आहे. कोणत्याही एका ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा भारताने नवा विक्रम केला आहे. ऑलिम्पिकमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
नीरज चोप्राच्या सुवर्ण पदका व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्य पदक जिंकले आहे. त्याच बरोबर भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले आणि कुस्तीमध्ये रवी दहिया व बजरंग पुनिया यांनी रौप्य पदक पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले; नीरज चोप्रावरील ‘त्या’ ट्वीटने पेटला नवा वाद
घरापासून १५-१६ किलोमीटर दूर सरावासाठी जायचा ‘गोल्ड मेडलिस्ट’ निरज, वडिलांनी सांगितला संघर्ष