भारतीय संघ २०२० च्या अखेरीस बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आला होता. ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ मेलबर्न येथील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत उतरला. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत होता.
चार सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने अफलातून पुनरागमन केले. या सामन्यात जबरदस्त नेतृत्व व जबाबदारीपूर्ण शतक करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे भरभरून कौतुक झाले. मात्र, याच वेळी मेलबर्नपासून २७३३ किमी अंतरावर असणाऱ्या माऊंट माऊन्गुई येथे देखील अशाच प्रकारे एका खेळाडूने झुंजार खेळ दाखवत न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचललेला. हा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर होय.
झुंजार वॅग्नर
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना माऊंट माऊन्गुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला गेला. न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन याच्या शतकाच्या तसेच, बीजे वॉटलींग आणि हेन्री निकोल्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ४३१ धावा उभारल्या. न्यूझीलंडच्या डावाच्या अखेरीस तळाचा फलंदाज नील वॅग्नर याच्या उजव्या पायाच्या बोटांवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा एक वेगवान यॉर्कर येऊन लागला. वेदनाशामक मारून त्याने कशीबशी १९ धावांची खेळी केली.
न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर वॅग्नरला दवाखान्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी निदान झाले की, वॅग्नरच्या पायाची दोन बोटे फ्रॅक्चर झाली आहेत व तो गोलंदाजी करेल की नाही याबाबत शंका उपस्थित झाली. मात्र, संघाची गरज ओळखता वॅग्नरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या पहिल्या डावात त्याने २१ षटके टाकताना फवाद आलम व शाहिन आफ्रिदी यांना तंबूत धाडले.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या २३९ धावांवर गुंडाळत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात १८० धावा करून डाव घोषित केला.
वॅग्नरचा मॅरेथॉन स्पेल
न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७३ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवसाच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ७३ अशी झाली होती. सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तान झटपट बाद होईल अशी अपेक्षा सर्वांनी ठेवलेली.
मात्र, बऱ्याच काळानंतर पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या फवाद आलमच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तो हळूहळू पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये विजयाची आशा निर्माण करु लागला होता. मात्र, यावेळी जवळपास चार दिवस दुखापतीसह खेळणारा नील वॅग्नर कर्णधार केन विलियम्सनच्या मदतीला धावून आला.
त्याने, दोन बोटे फॅक्चर असताना, वेदनाशामक इंजेक्शन व औषध घेत एका बाजूने सलग तब्बल ११ षटके गोलंदाजी केली. त्याचेच फळ म्हणून काय शतक झळकावून खेळत असणाऱ्या फवाद आलमला त्याने बाद करत न्यूझीलंडला विजयाच्या जवळ नेले. फहीम अश्रफचा काटा काढत त्याने पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशादेखील उध्वस्त केल्या. न्यूझीलंडने या सामन्यात १०१ धावांनी विजय साजरा करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
न्यूझीलंडचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्याचा मार्ग झाला मोकळा
माऊंट माऊन्गुई येथील विजयानंतर न्यूझीलंडने प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी जाण्याचा मान मिळवला. मालिकेतील दुसरी आणि अखेरची कसोटी देखील जिंकत त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आणि न्यूझीलंड कसोटी क्रिकेटमधील सर्वात ऐतिहासिक सामन्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला.
वॅग्नरच्या या लढाऊ वृत्तीमुळेच सर्वांना भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याची आठवण झाली. कुंबळे याने जबडा तुटलेला असतानादेखील २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरत सलग १४ षटके गोलंदाजी केली होती. वॅग्नरचे हे समर्पण पाहून पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान म्हणाला होता, ‘तू वेडा आहेस, रिस्पेक्ट’. परंतु, वॅग्नरच्या याच वेडेपणाने न्यूझीलंड संघ व क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दिवस दाखवला हे नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदम भारी! मुलगी झिवाच्या इंस्टा अकाऊंटवरून घडले ‘कॅप्टन कूल’ धोनीचे दर्शन; शिमलामध्ये घालवतोय वेळ
माणुसकी जपावी तर कोहलीसारखी! लचक भरली असतानाही स्वीकारले होते सिराजच्या घरी जेवणाचे आमंत्रण






