---Advertisement---

‘आम्ही इथे फक्त खेळायला नाही, तर कडवी टक्कर…’, इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर नेपाळ कर्णधाराचा इशारा

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 9:56 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पाचव्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने नेपाळसमोर 185 धावांचे आव्हान ठेवले होते. नेपाळने लक्ष्याचा पाठलाग करताना एका टप्प्यावर सामना आपल्या बाजूने वळवला होता, मात्र अखेरच्या षटकात दबावाखाली नेपाळच्या फलंदाजांना अपयश आले. शेवटच्या 6 चेंडूंवर 10 धावांची गरज असताना नेपाळला केवळ 5 धावाच करता आल्या ज्यामुळे विजय थोडक्यात हुकला.

या पराभवानंतर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल निराश दिसला असला, तरी त्याने संघाच्या कामगिरीचे मनापासून कौतुक केले. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि लढाऊ वृत्ती अभिमानास्पद असल्याचे त्याने सांगितले.

सामन्यानंतर पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना रोहित पौडेल म्हणाला, “निराशा आहेच, पण त्याहून अधिक अभिमान आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आमच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ केला, त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. मैदानात उतरताना आम्ही एकच संदेश दिला होता. 110 टक्के देऊ. आणि मुलांनी ते करून दाखवले.”

तो पुढे म्हणाला, “या वर्ल्ड कपमध्ये आम्ही फक्त खेळण्यासाठी नाही, तर लढत देण्यासाठी आलो आहोत. आम्हाला विश्वास होता की आमचा सर्वोत्तम खेळ झाला, तर आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो.”

डेथ बॉलिंगबाबत बोलताना रोहित म्हणाला,“आज आमचा एकूण प्रयत्न 100 टक्के होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात. मात्र डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला सुधारणा करावी लागेल. त्या टप्प्यावर गोलंदाजी करणे अवघड असते. यॉर्कर, स्लो बाऊन्सर अचूक टाकणे महत्त्वाचे असते. शेवटच्या षटकात सॅम करनने अप्रतिम गोलंदाजी केली आणि तिथेच सामना फिरला.”

आदिल रशीदच्या षटकांवर आक्रमण करण्याबाबत विचारले असता रोहित पौडेल म्हणाला की, त्यासाठी आधीच ठरवलेला कोणताही खास प्लॅन नव्हता. मात्र सामन्यादरम्यान संघाने एकत्रितपणे निर्णय घेतला आणि त्याचा फायदा नेपाळला झाला.

आगामी सामन्यांबाबत बोलताना रोहित म्हणाला की, नेपाळ कोणत्याही संघाला हलक्यात घेणार नाही. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यावर संघाचा भर राहील, असे त्याने स्पष्ट केले. नेपाळच्या चाहत्यांचे आभार मानताना रोहित पौडेल म्हणाला की, मैदानावर आणि मैदानाबाहेर मिळणारा त्यांचा पाठिंबा खेळाडूंना मोठे बळ देतो. चाहत्यांच्या अपेक्षा आणि विश्वास घेऊनच संघ मैदानात उतरतो आणि आज संपूर्ण नेपाळला संघाचा अभिमान वाटेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---