---Advertisement---

नेपाळ संघाने रचला इतिहास! यूएईला लोळवत मिळवले आशिया चषक 2023चे तिकीट, ‘हे’ 6 संघ उतरणार मैदानात

Nepal-Cricket-Team
---Advertisement---

जवळपास 3 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या लहानशा नेपाळ देशाच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेपाळ संघाने 1 मे रोजी इतिहास रचला. आशिया चषक 2023साठी नेपाळ क्रिकेट संघ क्वालिफाय झाला आहे. नेपाळ संघाने ही कामगिरी आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच केली आहे. एसीसी पुरुष प्रीमिअर लीगमध्ये नेपाळ संघाने अंतिम सामन्यात यूएई संघाला पराभवाचा धक्का देत आशिया चषक 2023चे तिकीट मिळवले. या स्पर्धेसाठी 5 संघ आधीपासून निश्चित होते, ज्यात भारत आणि पाकिस्तान संघाच्या नावाचाही समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघांव्यतिरिक्त आशिया चषक 2023 स्पर्धेत गतविजेता श्रीलंका संघ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघही खेळणार आहेत. आता नेपाळनेही स्पर्धेतील सहावा संघ म्हणून एन्ट्री केली आहे. मागच्या वेळी जेव्हा ही स्पर्धा खेळण्यात आली होती, तेव्हा यूएई संंघ स्पर्धेतील सहावा संघ होता. मात्र, अद्याप हे निश्चित होऊ शकत नाही की, आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन कुठे होईल. सध्या याचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे.

नेपाळ विरुद्ध यूएई (Nepal vs UAE) संघाविषयी बोलायचं झालं, तर यामध्ये नेपाळ संघाचा कर्णधार रोहित कुमार याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला. कारण, यूएई संघ 33.1 षटकात 117 धावांवरच सर्वबाद झाला होता. यावेळी यूएईकडून आसिफ खानने 46 धावा केल्या, पण त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यावेळी नेपाळकडून गोलंदाजी करताना ललित राजबंशी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, करण केसी आणि संदीप लामिछाने याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त सोमपाल कामी आणि गुलसान झा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

तसेच, नेपाळ संघाने 3 विकेट्स गमावत 118 धावांचे आव्हान 30.2 षटकात गाठले. तसेच, आशिया चषकासाठी पात्र ठरत इतिहास रचला. यावेळी नेपाळकडून गुलसान झा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 84 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी साकारली. यामध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त भीम शारकी यानेही 72 चेंडूत नाबाद 36 धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यूएईकडून यावेळी रोहन मुस्तफा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अयान खान यानेही 1 विकेट नावावर केली. (nepal cricket team qualified into the asia cup 2023 for the first time in history)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊच्या चाहत्यांना विराटने केले आपलेसे! सामन्यानंतर केलेले ट्विट चर्चेत

‘यशस्वी भारतीय क्रिकेटचे भविष्य’, संगकाराकडून जयस्वालचे तोंडभरून कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---