अविस्मरणीय २०११चा वनडे क्रिकेट वर्ल्डकप भारतात झाला आणि साऱ्या भारतीयांची अपेक्षापूर्ती करत धोनीच्या टीम इंडियाने २८ वर्षानंतर वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. भारत क्रिकेटवर नेहमीच प्रेम करणारा देश. आपल्या देशात क्रिकेटचा हा सर्वात मोठा सोहळा पाहण्याचे भाग्य अनेकांना ‘याची देहा, याची डोळा’ लाभले. अनेक बड्या टीमच्या बड्या प्लेयर्सव्यतिरिक्त असोसिएट देशांच्या प्रतिभावान प्लेअर्सवरही साऱ्यांची नजर पडली. असोसिएट देशाकडून खेळलेला पण एकदम वर्ल्ड क्लास वाटला असा, त्या वर्ल्डकपचा चर्चित राहिलेला चेहरा म्हणजे नेदरलँड्सचा रेयान टेन डोश्चे. भारतीय क्रिकेटप्रेमींना बर्यापैकी परिचित असलेल्या याच डोश्चेचा प्रवास आज आपण पाहणार आहोत.
नेदरलँड्ससाठी खेळला त्यांचा दिग्गज बनला, म्हणून अनेकांना वाटेल त्याचा मुक्काम पोस्ट तिथलंच असेल, पण असं नाहीये. रेयानचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथचा. दक्षिण आफ्रिकेच्या लोकांच्या रक्तात जणूकाही खेळच आहे. ते कधीच एका खेळावर अवलंबून नसतात. एका प्रमुख खेळाच्या जोडीला आणखी एखाद दोन खेळ त्यांना लागतातच. एबी डिव्हिलियर्स त्याचं आपल्याला माहीत असलेलं सर्वात्तम उदाहरण. अगदी तसंच डोश्चेच होतं. शाळेत असताना तो क्रिकेट सोबतच रग्बी आणि गोल्फही खेळायचा.
डोश्चे आणि त्याच क्रिकेट करियर हा किस्सा देखील बराच गमतीदार आहे बरं का. डोश्चे पहिल्यापासून चांगलंच क्रिकेट खेळायचा, पण त्याने कधीच त्याच्याकडे तितक्या गांभीर्याने पाहिलं नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने क्रिकेटला सीरियसली घ्यायला सुरुवात केली. त्याचं झालं असं की, इंग्लंडचे लिजंड क्रिकेटर ग्रॅहम गूच २००३ मध्ये ससेक्स काउंटी टीम घेऊन दक्षिण आफ्रिका टूरवर गेले. वेस्टन प्रोविन्सच्या बी टीमशी त्यांचा मुकाबला व्हायचा होता. चार दिवसांच्या त्या मॅचमध्ये रेयान जबरदस्त खेळला. गूच यांच्यासारख्या पारख्यान पाहिला की, हे पाणी वेगळेच आहे. नॅचरल टॅलेंट म्हणजे काय असतं हे त्या दिवशी गुच यांना दिसलं. त्यावेळी वेस्टन प्रोविन्सच्या टीमचे कोच असलेले पीटर कस्टर्न हे गूच यांचे खास मित्र. गूच यांनी रेयानला डायरेक्ट इंग्लंडमध्ये खेळवायची ऑफर टाकली. इथून खरं तर सुरू झाला त्याच्या क्रिकेटिंग करिअरचा प्रवास.
हेही पाहा- नेदरलँड्सचा असला तरी त्याला सर्वात जास्त प्रेम भारतात मिळालं
रेयान इंग्लंडमध्ये आला आणि ससेक्ससाठी खेळू लागला. त्याच्याकडे नेदरलॅंड्सचाही पासपोर्ट असल्याने तो दक्षिण आफ्रिका किंवा नेदरलँड्स दोन पैकी एका देशासाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकत होता. जेव्हा त्याला एक पर्याय निवडायचा होता, तेव्हा त्याने नेदरलँड्स निवडला. अगदी इंग्लंडच्या बॉर्डरला असल तरी, नेदरलँड्स क्रिकेट अजूनही बाल्यावस्थेत आहे. नाही म्हणायला ते वर्ल्डकप वगैरे खेळतात, पण म्हणावे तसे यश त्यांना अजूनही मिळाले नाही.
नेदरलँड्स क्रिकेटमध्ये जेव्हा डोश्चेची एन्ट्री झाली तेव्हापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या. आयसीसीच्या इंटरकॉन्टीनेंटल ट्रॉफीमध्ये त्याने अक्षरशः राडा घातला. त्याच परफॉर्मन्सच्या जोरावर त्याला २००७ वर्ल्डकपचे तिकीट भेटले. अनेकांना कदाचित माहीतच नसेल पण, २००७ वर्ल्ड कपला टीम इंडियाच्या खऱ्या मर्यादा याच डोश्चेने उघड्या पाडलेल्या. होय त्यावेळी सचिन, गांगुली, द्रविड, धोनी, सेहवाग अशी स्टार स्टडेड बॅटिंग लाईनअप असताना डोश्चेने प्रॅक्टिस मॅचमध्ये पाच विकेट घेतलेल्या. पुढे टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये काय फियास्को झाला हे आपल्याला माहीतच आहे.
डोश्चेला सुरुवातीच्या काळात वनडेचा ब्रॅडमन म्हटलं जायचं. कारण होतं पहिल्या १००० वनडे रन्स बनवताना त्याचं ऍव्हरेज होतं ६७ चं. डोश्चे परफॉर्मन्स नेहमी कडक देत राहिला, पण नेदरलँड्ससारख्या असोसिएट देशासाठी खेळत असल्याने, त्याची ओळख म्हणावी तशी बनत नव्हती. अखेर मोठ्या स्टेजवर परफॉर्मन्स करायची संधी त्याला मिळाली २०११ वर्ल्डकपमधून. त्याची दोन शतके त्याच्या टॅलेंटची ग्वाही देत होती. इंग्लंडसारख्या मातब्बर टीम विरोधात त्यान ठोकलेली क्लास सेंचुरी आजही वर्ल्डकपची ‘वन ऑफ द बेस्ट इनिंग’ मानली जाते. इथूनच खर्या अर्थाने जगाला रेयान टेन डोश्चे हे नाव कळाले.
पुढे त्याला स्वतःला सिद्ध करायची आणखी एक संधी मिळाली. ती म्हणजे आयपीएलमध्ये. २०११ आयपीएल वेळी कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्याचा परफॉर्मन्सही भारीच राहिला. केकेआरचा त्याच्यावर इतका विश्वास होता की, डोश्चे सलग पाच वर्ष केकेआरसाठीच खेळला. आयपीएल खेळणारा तो पहिलाच असोसिएट देशांचा प्लेअर. आजही अनेकांना रेयान टेन डोश्चे हा नेदरलँड्स जर्सीपेक्षा केकेआरच्या जर्सीतील आठवत असेल. डोश्चे स्वतः म्हणतो की, मला माझ्या देशापेक्षा भारतात अधिक प्रसिद्धी मिळाली. मला तिथे यायला, राहायला, खायला, फिरायला खूप आवडतं.
जवळपास दीड दशकांच्या प्रदीर्घ इंटरनॅशनल करियरनंतर २०२१ टी२० वर्ल्डकपमध्ये लास्ट टाईम खेळ त्याने क्रिकेटला अलविदा केला. नेदरलँड्ससारख्या क्रिकेटची संस्कृती नसलेल्या देशासाठी खेळूनही वेळोवेळी आपल्या प्रतिभेची छाप डोश्चेनी पाडली. जेव्हा-केव्हा नेदरलँड्स क्रिकेटचा इतिहास लिहायला घेतला जाईल, तेव्हा त्यात नेदरलँड्स क्रिकेटचा पहिला लिजंड म्हणून, ‘रेयान टेन डोश्चे’ हेच नाव लिहण्यात येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नावावर असणारे लाजिरवाणे विक्रम; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नको रे बाबा!’
कितीही ट्रोल केला गेला असला, तरी पॉंटिंगला भावलेला डिंडा भारतासाठी खेळलाच