नेदरलँड्स संघाला पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) पार पडलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 40व्या सामन्यात इंग्लंडने 160 धावांनी नेदरलँड्सला पराभवाचा धक्का दिला. हा नेदरलँड्सचा स्पर्धेतील सहावा पराभव ठरला. या सामन्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने पराभवाचे मोठे कारण सांगितले. चला तर, तो काय म्हणाला जाणून घेऊयात…
या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 339 धावा केल्या. यामध्ये बेन स्टोक्स याच्या 108 धावांच्या शतकी खेळीचा समावेश होता. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड्स संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा डाव 37.2 षटकातच 179 धावांवर संपुष्टात आला.
काय म्हणाला कर्णधार?
दारुण पराभवानंतर स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने मोठे विधान केले. तो म्हणाला, “गोलंदाजीत आमची सुरुवात चांगली राहिली नाही. आम्ही सुरुवातीला त्यांना सहज धावा करू दिल्या. मधल्या षटकात आम्ही पुनरागमन केले होते, पण अखेरीस आम्ही त्यांना पुन्हा वेगाने धावा करू दिल्या. फलंदाजीत आम्ही पुन्हा एकदा जुन्याप्रकारेच खेळतो. 43व्या षटकापर्यंत आम्ही त्यांना रोखून ठेवले होते. कदाचित आम्ही वेगळी काही योजना आखू शकत होतो. मात्र, याचे श्रेय इंग्लंडला दिले गेले पाहिजे. कारण, त्यांनी खूपच जबरदस्त फलंदाजी केली.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “340 आव्हानाचा पाठलाग करताना आम्हाला संतुलन शोधण्याची गरज आहे. आम्हाला हे पाहावे लागेल की, आम्ही चांगले काय करू शकतो. आम्ही तुकड्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि दीर्घ काळ हे कायम ठेवू शकलो नाहीत. बंगळुरूत भारताविरुद्ध आमचा पुढील सामना होणार आहे आणि तेथील माहोल शानदार असणार आहे.”
नेदरलँड्स संघाच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यातील एक विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवला होता. या विजयानंतर त्यांनी अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला होता. (netherlands skipper scott edwards reacts after defeat vs england)
हेही वाचा-
खुशखबर! वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलच्या तिकिटांबाबत मोठी अपडेट, कुठे आणि कसे कराल खरेदी? घ्या जाणून
सलग 5 पराभवांनंतर विजय मिळवताच बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘…तर चांगले झाले असते’