---Advertisement---

टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध आजपर्यंत कोणालाही न जमलेला विक्रम न्यूझीलंडने करुन दाखवला

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 12:16 AM
---Advertisement---

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने या सामन्यात ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताविरुद्धचा तिसरा विजय होता.

त्यामुळे टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत न्यूझीलंडने अव्वल क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाची बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजनेही भारताविरुद्ध टी२० विश्वचषकात खेळलेल्या एकूण ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध २००९, २०१० आणि २०१६ सालच्या स्पर्धेत विजय मिळवला आहे, २०१४ साली भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध बाजी मारली आहे.

या यादीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ आहेत. या दोन्ही संघांनी भारताविरुद्ध टी२० विश्वचषकात प्रत्येकी २ विजय मिळवले आहेत.

न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय
याशिवाय न्यूझीलंड असा पहिलाच संघ बनला आहे, ज्यांनी टी२० विश्वचषकात सलग तीन सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांचा टी२० विश्वचषकातील सामना २००७ आणि २०१६ साली झाला होती. २००७ साली न्यूझीलंडने १० धावांनी विजय मिळवला होता, तर २०१६ साली न्यूझीलंड संघ ४७ धावांनी जिंकले होते. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही.

वेस्ट इंडिजने जरी भारताविरुद्ध टी२० विश्वचषकात ३ विजय मिळवले असले, तरी त्यांनी ते सलग तीन सामन्यांत मिळवलेले नाहीत.

भारताचा पराभव
रविवारी भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद ११० धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद २६ धावांची खेळी केली. तसेच हार्दिकने २३ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त एकाही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच इश सोधीने २ विकेट्स घेतल्या, तर टीम साऊथी आणि ऍडम मिल्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने १४.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर, कर्णधार केन विलियम्सनने ३३ धावांचे योगदान दिले. याशिवाय सलामीवीर मार्टिन गप्टीलने २० धावांची खेळी केली. भारताकडून केवळ जसप्रीत बुमराहला विकेट्स घेण्यात यश आले. त्याने २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्विटरवर सुरू झाला बॅन आयपीएल ट्रेंड; चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

‘किवी’ पुन्हा नडले! न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत विजयाची प्रतिक्षा लांबली, भारताचा १८ वर्षांतील ७ वा पराभव

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली टीम इंडियाची नाचक्की; टी२० विश्वचषकातील…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---