भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टॉम लॅथमला न्यूझीलंडचा कर्णधार बनवण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम साऊदीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर टॉम लॅथमकडे न्यूझीलंडचे कर्णधारपद सोपवण्यात आले. आता तो भारताविरुद्ध कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी टॉम लॅथमने मोठे वक्तव्य केले आहे.
न्यूझीलंडला अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर किवी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. अनुभवी खेळाडू केन विल्यमसन भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाची फलंदाजी थोडी कमकुवत झाली आहे. दुसरीकडे भारतीय संघ चांगलाच फॉर्मात आहे. टीम इंडियाने नुकतेच बांग्लादेशचा हरवले आहे.
टॉम लॅथमच्या मते, त्यांचा संघ या कसोटी मालिकेत भारतासमोर कडवे आव्हान उभे करेल. संवादादरम्यान तो म्हणाला, “आपण करत असलेल्या चांगल्या गोष्टी सुरू ठेवल्या पाहिजेत. भारताचा दौरा करणे नेहमीच आव्हानात्मक असते. आम्ही तिथे (भारत) गेल्यावर, आम्ही कोणतीही भीती न बाळगता खुलेपणाने खेळू आणि त्यांना खडतर आव्हान देऊ अशी आशा आहे. जर आपण हे करण्यात यशस्वी झालो तर आशा आहे की आपण स्वतःला एक चांगली संधी देऊ शकू. भारतात जे संघ आक्रमक पद्धतीने खेळले ते यशस्वी झाल्याचे आपण पाहिले आहे. आपण त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये, दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबर पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ पुढीलप्रमाणे-
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साऊदी, केन विल्यमसन आणि विल यंग.
हेही वाचा-
झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO
कर्णधार रोहित शर्माने मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले; जखमी मुशीर खानची घेतली भेट
तिसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, गौतम गंभीरच्या खास खेळाडूला स्थान?