भारतात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्याचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला आहे. हा हंगाम २९ सामन्यांनंतर संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू हळू-हळू त्यांच्या मायदेशी परतले आहेत. नुकताच आयपीएल २०२१ चा भाग असलेला न्यूझीलंड क्रिकेटपटूंचा ताफा आपल्या मायदेशी सुखरुप परतला आहे.
आयपीएल २०२१ चा भाग असलेले न्यूझीलंडचे सदस्य २ ताफ्यांमध्ये मायदेशी परतले आहे. पहिल्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट, जीमी निशम, फिन ऍलेन, ऍडम मिल्ने, स्कॉट कुग्लेजिन, शेन बॉन्ड, माईक हेसन आणि जेम्स पामेंट यांचा समावेश होता. तर दुसऱ्या ताफ्यात स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्यूलम, काईल मिल्स, लॉकी फर्ग्यूसन, स्कॉट स्टायरिस, सायमन डूल आणि ख्रिस गॅफेनी यांचा समावेश होता. हे सर्व आता पुढील काही दिवस आयसोलेशनमध्ये राहातील.
ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडला रवाना झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की ‘माझे मन भारतीय लोकांसाठी दु:खी होत आहे. मला मुंबई इंडियन्सच्या परिवाराला आणि आयपीएलला सोडताना दु:ख होत आहे. पण हे दु:ख त्या दु:खासमोर काहीच नाही, ज्याचा सामना अनेक लोक सध्या करत आहेत.;
त्याने पुढे लिहिले, ‘भारत एक अशी जागा आहे, जिथून मला एक क्रिकेटपटू म्हणून आणि व्यक्ती म्हणून खूप काही मिळाले आहे. मी नेहमीच भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ असेल. ही कठीण वेळ आहे आणि मला आशा आहे की गोष्टी लवकरच सुधारतील. मी या सुंदर देशात पुन्हा येण्याची वाट पाहातोय.’
याशिवाय बोल्टने मुंबई इंडियन्सचेही घरी सुखरुप पोहचवल्याबद्दल आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. याबरोबर त्याने सर्वांना सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असेही सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/COoWy_Dtmpa/
न्यूझीलंडचे बरेच खेळाडू जरी मायदेशी परतले असले तरी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा भाग असलेले केन विलियम्सन, काईल जेमिसन आणि मिशेल सँटेनर हे खेळाडू आणि फिजीओ टॉमी सिमसेक हे मालदीवला गेले आहेत. तेथून ते इंग्लंडला रवाना होतील. जूनमध्ये सुरुवातीलाच न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यांना भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना देखील इंग्लंडमध्येच खेळायचा आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा भाग असलेले सदस्य मायदेशी गेले नाहीत.
न्यूझीलंडचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडच्या या ४ सदस्यांव्यतिरिक्य आयपीएल २०२१ चा भाग असलेले अन्य सदस्य न्यूझीलंडला परतले आहेत. केवळ टीम सिफर्टला भारतात रहावे लागणार आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असलेला सिफर्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला आणखी काही दिवस भारतात क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्सचे परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी रवाना
नुकतेच मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या ट्विटरवरुन त्यांच्या संघातील सर्व परदेशी खेळाडू सुरक्षित आपल्या मायदेशी परतले असल्याचे सांगितले आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1391309145878319104
मुंबई इंडियन्सने त्यांच्या परदेशी खेळाडूंसाठी खाजगी विमानांची सोय केली होती. त्यांच्या संघाशी जोडलेले एकूण १४ परदेशी सदस्य होते. हे सर्व आता आपापल्या मायदेशी परतले आहेत. केवळ श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज आणि मुंबईचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लीन आणि नॅथन कुल्टर-नाईलसह मालदीवला गेला आहे. तिथे १४ दिवस ते क्वारंटाईन असतील.
सध्या ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या सर्वांसाठी १५ मे पर्यंत सीमाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ चा भाग असलेले सर्व ऑस्ट्रेलियाचे सदस्य सध्या मालदीवला गेले आहेत. तेथून ते मायदेशी परततील.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ‘अशा’ फरकाने जिंकेल टीम इंडिया, ‘द वॉल’ द्रविडची भविष्यवाणी
पाहाव ते नवलंच! चक्क हत्ती करतोय फलंदाजी, व्हिडिओ पाहून व्हाल चकीत
‘…तर बुमराह सहज ४०० कसोटी विकेट्स घेऊ शकतो’, महान वेगवान गोलंदाजाचे भाष्य






