टी२० विश्वचषक २०२१ चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाच विकेट्स राखून पराभूत केले. या विजयानंतर न्यूझीलंड टी२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. अंतिम सामन्यासाठी दुसरा संघ गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यानंतर निश्चित होईल.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघ यापूर्वी एकदाही अंतिम सामन्यात पोहोचू शकला नव्हता. ही पहिली वेळ आहे, जेव्हा न्यूझीलंडने अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. तसेच न्यूझीलंड टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा आतापर्यंतचा ७ वा संघ ठरला आहे.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी केवळ सहा संघ होते, जे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळले होते. न्यूझीलंड आता ७ वा संघ बनला आहे, जो या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे.
यापूर्वी टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या संघांचा विचार केला तर यामध्ये श्रीलंका, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होता. आता या यादीत न्यूझीलंडचेही नाव सामील झाले आहे. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिका अजून एकदाही या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकलेला नाही.
टी२० विश्वचषकाचे अंतिम सामने खेळणाऱ्यांच्या यादीत, श्रीलंका संघाने आतापर्यंत सर्वाधिक तीन वेळा टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहेत. यामध्ये त्यांनी एकदा विजय मिळवला आहे. इंग्लंडने दोन अंतिम सामने खेळले आणि एक विजय मिळवला आहे. अगदी अशीच अवस्था भारत आणि पाकिस्तान यांचीही आहे. या दोन्ही संघांनी दोन अंतिम सामने खेळले आहेत आणि त्यातील एक सामना जिंकला आहे.
वेस्ट इंडीजचे प्रदर्शन मात्र लक्षवेधक आहे. वेस्ट इंडीजने दोन अंतिम सामने खेळले आहे आणि दोन्हीमध्ये विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियाने एक अंतिम सामना खेळला आहे आणि तोदेखील गमावला आहे. आता न्यूझीलंड त्याच्या टी२० विश्वचषकातील पहिल्या अंतिम सामन्यात विजय मिळवू शकेल की नाही, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम इंग्लंडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९ षटकात हे लक्ष्य गाठले.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने या सामन्यात ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या आणि त्याला या कामगिरीसाठी सामनावीर निवडण्यात आहे. तसेच न्यूझीलंडकडून जिमी निशामने ११ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्याचबरोबर डेवॉन कॉनवेने ३८ चेंडूत ४६ धावांची महत्त्वपूर्वी खेळी केली.
इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोन आणि क्रिस वोक्स या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, पण न्यूझीलंडला १६६ धावसंख्येच्या आत ते रोखू शकले नाहीत. परिणामी न्यूझीलंडने विजय मिळवून अंतिम सामना गाठला आणि इंग्लंडचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलने घडवला इतिहास! दोन्ही संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ गोष्टी