ऑकलँड। न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) म्हटले की, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजने पुष्टी केली आहे की ते येत्या उन्हाळ्यात त्यांच्या देशाचा दौरा करणार आहेत. व्हाईट म्हणाले की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ज्या पद्धतीने जैव-सुरक्षित वातावरण तयार केले आहे, त्याप्रकारचे जैव- सुरक्षित वातावरण न्यूझीलंड क्रिकेट तयार करत आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना व्हाईट म्हणाले की, “आम्ही शानदार प्रगती करत आहोत. मी नुकतेच वेस्ट इंडिजशी फोनवर चर्चा केली आहे. ते इथे येणार असल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशनेही न्यूझीलंड दौऱ्यासाठी होकार दिला आहे. अशामध्ये आमच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ३७ दिवस आहेत.”
सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार महिला संघ
व्हाईट यांनी पुढे बोलताना म्हटले, “न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल, तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडला येईल. आम्ही आता वेळापत्रकावर काम करत आहोत. परंतु या ५ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका होण्याची अपेक्षा आहे.” न्यूझीलंडमध्ये परदेशाहून येणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागते.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा आहे भाग
भविष्य दौरा कार्यक्रमानुसार (एफटीपी), न्यूझीलंड संघाला कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघाचे यजमानपद सांभाळायचे आहे. यातील कसोटी मालिका ही जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे. बांगलादेश संघाला वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करेल.
न्यूझीलंडमध्ये कोविड-१९ व्हायरसमुळे मार्चपासून क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टी ठप्प आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि रॉस टेलर यांसोबतच देशाचे अव्वल खेळाडू मागील महिन्यात सराव शिबिरासाठी परतले आहेत.
न्यूझीलंड हा देश कोविड-१९ व्हायरसची कमी प्रकरणे असणाऱ्या देशांपैकी एक आहे. न्यूझीलंडमध्ये या व्हायरसची आतापर्यंत १५७९ प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण ठीक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-कित्येक भारतीय क्रिकेटर्सची कारकिर्द घडवणारा मुंबईकर काळाच्या पडद्याआड
-पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी
-कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे हुकले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कसोटी पदार्पण
ट्रेंडिंग लेख-
-४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
-ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
-कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश