भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी (India vs New zealand Test) मध्ये बरेच विक्रम झाले, पण फिरकीपटू एजाज पटेल याचं उत्कृष्ट प्रदर्शन अविस्मरणीय आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीत भारताच्या सगळ्या, १० विकेट्स घेऊन इतिहास रचला होता. आणि आता त्याला आयपीएल (IPL) मध्ये खेळण्याची उत्सुकता लागली आहे. शक्यता अशी आहे की, आता होणाऱ्या लिलावात त्याच्यावर बोली देखील लावली जाईल. यावेळेस आयपीएलमध्ये १० संघ आहेत, त्यामुळे बऱ्याच खेळाडूंना संधी मिळू शकते.
आयपीएलबद्दल एजाज म्हणाला…
एजाज पटेलने आयपीएलबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “जर त्याला या लोकप्रिय टूर्नामेंटमध्ये खेळायची संधी मिळाली तर तो स्वतःला खूप भाग्यवान समजेल. आयपीएल एक उत्कृष्ट टूर्नामेंट आहे आणि त्याचे जगभरात चाहते आहेत. ही टूर्नामेंट सगळे जण बघतात आणि या टूर्नामेंटमध्ये खेळणं एखाद्या खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते.”
एजाजचा भारताविरुद्ध विक्रम
एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावांत ४७.५ षटके टाकून ११९ धावा देत सगळ्या १० विकेट्स घेतल्या होत्या. एजाज पटेल इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जिम लेकर (Jim Laker) (१९५६) आणि भारताचे अनिल कुंबळे (Anil Kumble) (१९९९) नंतर असा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याने याच सामन्याच्या दुसऱ्या डावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे एका सामन्यात १४ विकेट्स घेत त्याने कसोटी कारकर्दीतील आतापर्यंतची उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
परंतु फिरकी गोलंदाजीत हातखंडा असलेल्या एजाजला पहिल्या कसोटीत विशेष कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात तो केवळ ३ विकेट्स घेऊ शकला होता.
कौतुकाची बाब म्हणजे, गोलंदाजीत आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या एजाजने या मालिकेदरम्यान फलंदाजीतही अनोखी कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो ५ धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर संघाच्या दुसऱ्या आणि सामन्यातील शेवटच्या डावात रचिन रविंद्रसोबत शेवटपर्यंत नाबाद राहत त्याने संघाचा पराभव टाळण्यात मोठा वाटा उचलला होता. सामन्याखेर २ धावांवर नाबाद राहत त्याने ही कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय गोलंदाज त्याला बाद करू शकले नाहीत. या सामन्यातील न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तो शून्यावर नाबाद राहिला. तर दुसऱ्या डावातही ५ चेंडूंचा सामना करताना एकही धाव न करता त्याने आपली विकेट वाचवून ठेवली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
काळजात धस्स करवणारी बातमी! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हत्तीचा हल्ला, दोघांचा मृत्यू
रोहित वनडेचा कॅप्टन बनताच ‘या’ ३ खेळाडूंच्या स्थानावर असेल टांगती तलवार! विराटचे आहेत लाडके शिलेदार
शतक हुकल्यानंतरही वॉर्नरचा ‘अनोखा’ विक्रम, पाचव्यांदा नो बॉलवर बाद होऊन केली मॅरेथॉन खेळी