बीसीसीआयने रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाच्या नवीन कर्णधाराच्या रूपात नियुक्त केले आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकेत रोहितला भारताच्या टी-२० संघाचे देखील कर्णधारपद सोपण्यात आले होते. रोहित शर्मा (rohit sharma) एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्यामुळे विराट कोहलीला या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताचा एकदिवसीय संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे.
दरम्यान, रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेल्यानंतर भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. संघाचा प्रत्येक कर्णधार त्याच्या आवडिच्या खेळाडूंना संघात सामील करू इच्छित असतो. विराटने त्याच्या कार्यकाळात तसेच केले असणार आणि एमएस धोनीने देखील तसेच केले असणार.
अशात रोहित देखील त्याच्या कार्यकाळात संघात काही बदल करू शकतो. रोहित कर्णधार झाल्यामुळे काही खेळाडू असे आहेत, ज्यांची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. कारण या खेळाडूंना विराटच्या कार्यकाळात संघात महत्वाचे स्थान मिळाले होते. पण आता त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आपण या लेखात अशाच तीन भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
१. वॉशिंगटन सुंदर –
वॉशिंगटन सुंदर विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएलमध्ये तो विराटच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. सुंदर भारताच्या तिन्ही प्रकारांमधील संघात खेळला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ३० टी-२० आंतरराष्ट्रीय, एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ४ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, आता रोहित शर्मा संघाचा कर्णधार बनल्यानंतर संघातील त्याची जागा कृणाल पांड्या किंवा जयंत यादव यांच्यापैकी कोणीतरी घेईल, अशी शक्यता आहे.
२. युजवेंद्र चहल –
भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर म्हटला जाणारा युजवेंद्र चहल देखील आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. चहल विराट कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात चहलला संधी दिली गेली नव्हती. विश्वचषकात चहलच्या जागी मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चाहरला संधी दिली गेली होती. अशात येत्या काळात रोहित राहुल चाहरलाच भारतीय संघात संधी देईल आणि युजवेंद्र चहलला संघाच्या बाहेर राहावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
३. मोहम्मद सिराज –
मोहम्मद सिराज त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सिराजने नुकत्याचा पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले आणि त्याचे कसोटी संघातील स्थान पक्के केले. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला अजून अपेक्षित संधी मिळालेल्या नाहीत. मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि अशात रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘धन्यवाद कॅप्टन…’ नेटकऱ्यांनी कान उपटल्यानंतर बीसीसीआयला जाग, विराटच्या आभारासाठी केले खास ट्विट