भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली. यासह निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील सोपवण्यात (New ODI Captain Rohit Sharma) आले आहे. यापूर्वी वनडे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे विराट कोहली (Virat Kohli) याच्या हाती होती. यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद सोडू इच्छित नव्हता. तो विश्वचषक २०२३ पर्यंत भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व करण्याच्या तयारीत होता. परंतु बीसीसीआयच्या डोक्यात वेगळीच योजना सुरू असून त्यांनी विराटला वनडे संघाचे नेतृत्त्व सोडण्यास ४८ तासांचा कालावधी दिला होता. परंतु विराटने या वेळेदरम्यान कसलीही प्रतिक्रिया न दिल्याने बीसीसीआयने स्वत:हून त्याची या पदावरुन हकालपट्टी केली आहे.
जवळपास साडे ४ वर्षे भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या विराटला बीसीसीआय सन्मानजनक निरोप देऊ इच्छित होती. परंतु त्याने बोर्डाचे म्हणणे न ऐकल्याने त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे.
विराटचे वनडे कर्णधार म्हणून प्रदर्शन
विराट भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. त्याच्या वनडेतील नेतृत्व कामगिरीवर नजर टाकल्यास, त्याला भारताचा सार्वकालिन महान वनडे कर्णधार म्हणणे वावगे ठरणार नाही. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वनडेत ९५ सामने खेळले असून त्यापैकी ६५ सामने जिंकले आहेत. यादरम्यान त्याची विजयी सरासरी ६८ टक्के इतकी राहिली आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने १९ तिरंगी मालिकांपैकी १५ मालिकांमध्ये बाजी मारली आहे. तसेच नेतृत्त्वाबरोबर फलंदाजीतही तो पुढे राहिला आहे. त्याने कर्णधार असताना वनडे क्रिकेटमध्ये ७२.६५ च्या सरासरीने फलंदाजी करताना ५४४९ धावा केल्या आहेत, ज्यात २१ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितपुढे असणार भरपूर आव्हाने
वनडे संघाच्या नेतृत्त्वपदी वर्णी लागलेल्या रोहितसाठी पुढील २ वर्षे आव्हानांनी भरलेली असतील. तो सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत विजयासह आपल्या नेतृत्त्व कारकिर्दीची सुरुवात करू इच्छेल. त्यानंतर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी२० विश्वचषक, २०२३ मध्ये भारतात होणारा वनडे विश्वचषक, या आयसीसी स्पर्धांचे आव्हान त्याच्यापुढे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून ऍशेसच्या पहिल्या सामन्यात स्टोक्सने हाताला बांधली ५६८ क्रमांकाची काळी पट्टी
असा कर्णधार होणे नाही! विश्वास बसत नसेल तर विराटची ‘ही’ आकडेवारी पाहा