आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे( आयसीसी) आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाचा अंतिम सामना न्यूझीलंड संघाने भारताविरुद्ध खेळताना ८ गडी राखून जिंकला. न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात पहिल्याच दिवसापासून पकड बनवून ठेवली होती. पावसामुळे सामन्यात बराच व्यत्यय आला, मात्र हा सामना पूर्ण झाला.
दरम्यान,भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलयम्सन यांचा सामन्यानंतरचा एक फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांकडून या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फोटोबद्दल विलियम्सनने आपले मत व्यक्त केले आहे.
न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकवून देण्यामध्ये कर्णधार विलयम्सनचा खूप मोलाचा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात पहिल्या डावात एकट्याने लढा देत न्यूझीलंड संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकीय खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. त्याने सामना संपल्यानंतर विराटची गळाभेट घेतली होती, या क्षणाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
इंडिया टूडेसोबत बोलताना विलयमसनने त्या फोटोबद्दल सांगितले की,”मी आणि विराट खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही चांगले मित्र आहोत. खेळांची हीच चांगली गोष्ट असते की, तुम्हाला जगातल्या विदेशी खेळाडूंसोबत मैत्री करायला मिळते. हा एक वेगळाच अनुभव असतो ज्यामध्ये आपणास एकत्र खेळायला आणि एकमेकांविरुद्ध खेळायला मिळते. तसेच एकाच मैदानवर खेळल्याने समान गोष्टी शेअर होतात.” कोहली आणि विलयमसन २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषकापासून एकमेकांना ओळखतात.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाची फलंदाजी पत्यांसारखी कोसळली. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात पाच वेगवान गोलंदाज खेळवले होते आणि पाचही गोलंदाजांनी भेदक मारा केला. न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत अंतिम सामन्यात दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले. खास गोष्ट म्हणजे त्याने विराटला दोन्ही डावात बाद केले. तसेच त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण २१ धावांची खेळीही केली. त्यामुळे त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारसुद्धा मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: शोएब अख्तरचा मुलगा ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फॅन; त्याच्याच गाण्यावर धरलाय ठेका
टी२० विश्वचषक भारतातून युएईमध्ये का हलवण्यात आला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा
WTC फायनलनंतर कडाडून टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघाच्या मदतीला धावला विलियम्सन, म्हणाला…