न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घालू पाहणाऱ्या इंग्लंड संघाला चांगलीच चपराक बसली. न्यूझीलंडने मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे खेळताना इंग्लंडचा 1 धावेने धुव्वा उडवला. त्यांच्या या विजयामुळे व्हाईट वॉश टाळला गेला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या विजयासाठी केन विलियम्सन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या विजयानंतर न्यूझीलंडने एकच जल्लोष केला. हा क्षण पाहण्यासाठी तब्बल 22 वर्षांची वाट पाहावी लागली.
या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंड (England) संघाने फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 435 धावांवर डाव घोषित केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा डाव 209 धावांवरच संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडकडे 226 धावांची आघाडी असल्यामुळे न्यूझीलंड संघ फॉलोऑन घेत फलंदाजीला उतरला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने नाद कामगिरी केली. त्यांनी सर्व विकेट्स गमावत 483 धावा केल्या. तसेच, इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावात दमदार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला. त्यांना सर्व विकेट्स गमावत 256 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने 1 धावेने विजय मिळवला.
तब्बल 22 वर्षे पाहावी लागली वाट
सामन्यातील इंग्लंडच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 37 वर्षीय नील वॅगनर (Neil Wagner) याने 15.2 षटकात 62 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याची सर्वत्र वाहवा होत आहे. तसेच, न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केन विलियम्सन (Kane Williamson) यानेही फलंदाजीतून दमदार योगदान दिले होते. त्याने 282 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह 132 धावा कुटल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली. या सामन्यात 1 धावेने विजय मिळवताच न्यूझीलंड संघाने एकच जल्लोष केला. यादरम्यानचा व्हिडिओ न्यूझीलंडने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत सर्व खेळाडू विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. हा क्षण पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना तब्ब्ल 22 वर्षे वाट पाहावी लागली.
Incredible scenes at the Basin Reserve. A thrilling end to the 2nd Test in Wellington 🏏 #NZvENG pic.twitter.com/tyG7laNtdP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 28, 2023
खरं तर, 2001 साली कोलकाता येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली होती. त्यातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला फॉलोऑन मिळाल्यानंतर भारताने 657 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांवरच संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारताने हा सामना 171 धावांनी जिंकला होता. 2001नंतर आता 2023मध्ये फॉलोऑन घेत न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे फॉलोऑननंतर विजय मिळवण्याचा क्षण पाहण्यासाठी तब्बल 22 वर्षे वाट पाहावी लागली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने हाणून पाडला बलाढ्य इंग्लंडचा डाव, कीवींच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी
मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल