---Advertisement---

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने हाणून पाडला बलाढ्य इंग्लंडचा डाव, कीवींच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी

On: मंगळवार, फेब्रुवारी 28, 2023 9:20 AM
NZ-vs-ENG
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. इंग्लंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील पहिला सामना इंग्लंडने तब्बल 267 धावांनी खिशात घातला होता. तसेच, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंड बाजी मारेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, न्यूझीलंडने त्यांचा डाव हाणून पाडला. तसेच, मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडवर 1 धावेने नजीकचा विजय मिळवला. या विजयासोबतच न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे, फॉलोऑननंतर झालेला हा इतिहासातील चौथाच विजय ठरला.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक यजमान संघाने जिंकली होती. तसेच, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडने फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 435 धावांवर डाव घोषित केला होता. हे आव्हान पार करताना न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवर संपुष्टात आला. यानंतर 226 धावांचा फॉलोऑन घेत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 483 धावा कुटल्या. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, इंग्लंड संघाला सर्व विकेट्स गमावत फक्त 256 धावाच करता आल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडचा 1 धावेने विजय (New Zealand won by 1 run) झाला.

https://twitter.com/ICC/status/1630406560143880194

सामन्याचा दुसरा डाव
इंग्लंडकडून 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फक्त जो रूट यालाच मोठी धावसंख्या उभारता आली. त्याने 113 चेंडूत 95 धावांचे योगदान दिले. यामध्ये 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त बेन फोक्स (35), बेन स्टोक्स (33), बेन डकेट (33) आणि झॅक क्राऊले (24) यांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. इतर एकानेही 15 धावांचा आकडाही पार केला नाही. विशेष म्हणजे, पहिल्या डावात दीडशतक ठोकणारा हॅरी ब्रूक या डावात डायमंड डक (एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद) झाला. यावेळी न्यूझीलंडकडून नील वॅगनर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार टीम साऊदी (Tim Southee) याने 3 आणि मॅट हेन्री याने 2 विकेट्स नावावर केल्या.

तसेच, इंग्लंडकडून मिळालेल्या 226 धावांच्या फॉलोऑननंतर न्यूझीलंडकडून केन विलियम्सन (Kane Williamson) याने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने 282 चेंडूत 132 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने यादरम्यान 12 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त टॉम ब्लंडेल (90), टॉम लॅथम (83), डेवॉन कॉनवे (61), डॅरिल मिचेल (54) आणि हेन्री निकोलस (29) यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. तळातील फलंदाजांना खास कामगिरी करता आली नव्हती. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जॅक लीच याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

पहिल्या डावात इंग्लंडचे वर्चस्व
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (Harry Brook) याने सर्वाधिक 186 धावा चोपल्या होत्या. त्याने या धावा 176 चेंडूत 5 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त जो रूट यानेही 153 धावांचे योगदान दिले होते. या दोघांव्यतिरिक्त फक्त कर्णधार बेन स्टोक्स (27) यालाच 20 धावांचा आकडा पार करता आला. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. मात्र, ब्रूक आणि रूटच्या दीडशतकी खेळीमुळे इंग्लंडने 435 एवढी मोठी धावसंख्या उभारली होती. यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्री याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, मायकल ब्रेसवेलने 2, तर टीम साऊदी आणि नील वॅगनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

इंग्लंडच्या 436 धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून फक्त कर्णधार टीम साऊदी यानेच 49 चेंडूत 73 धावा कुटल्या. यामध्ये 5 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त टॉम ब्लंडेल (38), टॉम लॅथम (35), हेन्री निकोलस (30) यांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. इतर 5 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले होते. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या होत्या. (New Zealand won by 1 run against england in 2nd test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या यशाचे गमक आहे ‘सपोर्ट स्टाफ’! स्वतः खेळाडूंनी केला ‘तो’ खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---