कसोटी क्रिकेटसाठी २३ जून २०२१ हा दिवस ऐतिहासिक ठरला. १४४ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटला बुधवारी (२३ जून) आपला पहिला विश्वविजेता संघ मिळाला. कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वविजेता होण्याचा मान पटकावला तो केन विलियम्सन कर्णधार असलेल्या न्यूझीलंड संघाने. हा मान पटकावल्यानंतर न्यूझीलंड संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
साऊथॅम्पटनमधील द रोज बाऊल मैदानावर १८ ते २३ असा एकूण ६ दिवसांचा नाट्यपूर्ण ठरलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला आणि इतिहास रचला. या विजयानंतर न्यूझीलंड संघाने ड्रेसिंग रुममध्ये जोरदार जल्लोष केला. या जल्लोषाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
टेलरचा विजयी चौकार आणि न्यूझीलंडचा जल्लोष
अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर दुसऱ्या डावात १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने वैयक्तिक अर्धशतक करताना अनुभवी फलंदाज रॉस टेलरसह नाबाद ९६ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडने ४६ व्या षटकात विजय मिळवला.
या सामन्यात जेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी केवळ ३ धावांची गरज होती, तेव्हा रॉस टेलरने ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मोहम्मद शमीविरुद्ध चौकार ठोकला आणि न्यूझीलंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘जिंकलो’ असा एकच जल्लोष झाला. या जल्लोषाचा व्हिडिओ न्यूझीलंडने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Significant dates! ✍🏽 #WTC21 #BACKTHEBLACKCAPS pic.twitter.com/kjwxzqfOTX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 23, 2021
या व्हिडिओमध्ये दिसते की टेलरने चौकार मारण्यापूर्वी न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडू शांततेच पण विजयाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याचवेळी टेलरने चौकार मारलेला पाहून या खेळाडूंनी आनंदाने उड्या मारत एकमेकांना घट्ट मिठी मारली. याबरोबरच त्यांनी एकत्र येत मोठ्याने जिंकल्याबद्दल जल्लोष केला. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
The @BLACKCAPS dressing room the moment Ross Taylor hit the winning runs in the #WTC21 Final 📹 pic.twitter.com/FAO5vuYGd8
— ICC (@ICC) June 23, 2021
२१ वर्षांनंतर न्यूझीलंडला आयसीसीचे विजेतेपद
सातत्याने पावसाचा येणारा व्यत्यय, कधी कमी प्रकाशाचा व्यत्यय अशा काही अडचणी येऊनही न्यूझीलंडने अखेरपर्यंत हार न मानता या सामन्यात विजय मिळवला आणि तब्बल २१ वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.
Scenes #BACKTHEBLACKCAPS pic.twitter.com/YsAg4c6t2t
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 23, 2021
यापूर्वी न्यूझीलंडने शेवटचे आयसीसी विजेतेपद २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळीही अंतिम सामन्यात भारतालाच पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडला दोन वेळा आयसीसी विजेतेपदाने हुलकावणी दिली. एकदा २०१५ विश्वचषकात तर दुसऱ्यांदा २०१९ विश्वचषकात, या दोन्ही स्पर्धांमध्ये न्यूझीलंड उपविजेता ठरला होता. मात्र, यावेळी न्यूझीलंडने अखेर आयसीसीचे विजेतेपद मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथची सावली मानल्या जाणाऱ्या लॅब्युशेनने गाजवली अख्खी ‘टेस्ट चॅम्पियनशिप’
जून महिना, इंग्लंडचे मैदान, भारतीय संघ अन् आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना-एक अनोखा योगायोग