आयसीसी महिला टी20 विश्वचषकाला नवा चॅम्पियन मिळाला आहे. न्यूझीलंडनं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून प्रथमच ही ट्रॉफी जिंकली.
भारताचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडनं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच चकित केलं आहे. विशेष म्हणजे, टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडचा सलग 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र आता त्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर ही एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. तर सुझी बेट्सनं मिताली राजचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम मोडला.
वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापूर्वी न्यूझीलंडच्या महिला संघानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्याआधी घरच्या मैदानावर किवी संघाचा इंग्लंडकडून 4-1 असा पराभव झाला होता. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंडनं न्यूझीलंडचा 5-0 असा व्हाईटवॉश केला होता, तर ऑस्ट्रेलियानं देखील तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला होता. इंग्लंडकडून सलग 7 सामने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून 3 सामने हरल्यानंतर हा संघ टी20 विश्वचषक खेळण्यासाठी आला होता.
न्यूझीलंडनं टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला सामना जिंकून शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर त्यांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशांना मोठा धक्का बसला. येथून संघानं प्रथम श्रीलंका आणि नंतर पाकिस्तानला पराभूत करून जोरदार पुनरागमन केलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. किवी संघानं उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. फायनलमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून प्रथमच टी20 विश्वचषकाचा खिताब पटकावला.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सलग दुसऱ्या विश्वचषक फायनलमध्ये पराभव झाला आहे. यापूर्वी जून 2024 मध्ये झालेल्या पुरुष टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. आता महिला संघाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला.
हेही वाचा –
टी20 वर्ल्डकप जिंकून न्यूझीलंड मालामाल, आयसीसीनं भारतावरही केला करोडोंचा वर्षाव
Women’s T20 World Cup; फायनलमध्ये आफ्रिकेला चितपट करून न्यूझीलंडने जिंकला विश्वचषक!
IND vs NZ; राहुल खेळला शेवटचा कसोटी सामना? व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ