वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16 सामने पार पडले आहेत. पुन्हा एकदा स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. बलाढ्य न्यूझीलंड संघाने विश्वचषकात आपले दमदार प्रदर्शन कायम ठेवत सलग चौथा सामना खिशात घातला. त्यांच्या या विजयामुळे त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान काबीज केले. न्यूझीलंडने भारताकडून हे स्थान हिसकावले. न्यूझीलंडने चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभूत केले. हा न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे, 1975 मध्ये त्यांनी सर्वात पहिला मोठा विजय साकारला होता. त्यांनी पूर्व आफ्रिकेला 181 धावांनी पराभवाची धूळ चारली होती.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) सामन्याविषयी बोलायचं झालं, तर इंग्लंडला नमवून आलेल्या अफगाणिस्तानचा न्यूझीलंडपुढे टिकाव लागला नाही. नियमित कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 288 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाचा डाव अवघ्या 139 धावांवर गडगडला.
यावेळी न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, ट्रेंट बोल्टने 2, तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनाही प्रत्येकी 1 विकेट मिळाली. उभय संघांच्या फलंदाजीविषयी बोलायचं झालं, तर अफगाणिस्तानचा एकही फलंदाज 40पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स (71), टॉम लॅथम (68) आणि विल यंग (54) यांनी अर्धशतक झळकावले.
पॉईंट्स टेबलमध्ये टॉपर
या विजयासह न्यूझीलंड संघाने पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुण मिळवले. तो एकमेव संघ आहे, ज्याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील आपले चारही सामने जिंकले आहेत. भारतीय संघ 3 विजय आणि 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताकडे गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून पुन्हा पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थान काबीज करण्याची संधी आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघांनी स्पर्धेतील प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत, तर 1-1 सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोघांचेही 4-4 गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटच्या आधारे दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या, तर पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सचे प्रत्येकी 2 गुण आहेत. तसेच, श्रीलंका विश्वचषकात असा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. ते गुणतालिकेत सर्वात खालच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहेत. (new zealands fourth win in world cup 2023 tom latham team tops wc points table know here)
हेही वाचा-
दारुण पराभवानंतर फिल्डर्सवर भडकला अफगाणी कर्णधार; म्हणाला, ‘आमचे क्षेत्ररक्षण खूपच खराब…’
अफगाणिस्तानला तब्बल 149 धावांनी हरवल्यानंतर काय म्हणाला टॉम लॅथम? भारताबद्दलही केलं लक्षवेधी भाष्य