इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने कांगारुंचा 3 गडी राखून पराभव केला आहे. या विजयाच्या सहाय्याने यजमानांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंड संघाच्या या विजयाचा हिरो ठरला तो स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन. ज्याने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 47 चेंडूत 6 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 87 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय गोलंदाजीतही त्याने दोन बळी घेतले. लिव्हिंगस्टोनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडने या लक्ष्याचा पाठलाग 6 चेंडू आणि 3 गडी बाकी असताना केला.
मिचेल मार्शला दुसऱ्या टी20 मधून वगळल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पाहुण्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. मार्शच्या जागी संघात आलेल्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने पहिले टी20 अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय जोश इंग्लिसने 42 आणि कर्णधार ट्रॅव्हिस हेडने 14 चेंडूत 31 धावा केल्या.
मोठ्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात चांगली झाली. चौथ्या षटकात विल जॅक आणि जॉर्डन कॉक्स बाद झाल्यानंतर कर्णधार फिलिप सॉल्टने (39) लियाम लिव्हिंगस्टोनसह डावाची धुरा सांभाळली. सॉल्ट आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या जेकब बेथेलने दुसऱ्या टी20 मध्ये धमाकेदार खेळी केली. बेथेलने लिव्हिंगस्टोनला पूर्ण साथ दिली. त्याने 24 चेंडूत 44 धावा केल्या.
मॅथ्यू शॉर्टने 5 विकेट्स घेत यजमानांना काही काळ अडचणीत आणले होते. परंतु अखेरीस इंग्लंडला विजयाची नोंद करण्यात यश आले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 सप्टेंबर रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.
हेही वाचा-
“रोहित लगान सिनेमातील आमिर खान सारखा”, युवा फलंदाजाने उधळली स्तुतीसुमने
IPL 2025 मध्ये धोनी खेळणार का? लवकरच होणार घोषणा
सर्वोत्कृष्ट सलामीवीर कोण? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मोठे वक्त्य