भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. रोहित 38 वर्षांचा झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत जे रोहितच्या नावावर आहेत, जे मोडणे अशक्य आहे. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात हिटमॅनच्या पाच अभेद्द विक्रम कोणत्या आहेत.
एका डावात 264 धावा केल्या
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे त्याची सर्वोच्च धावसंख्या. सचिन तेंडुलकरने फेब्रुवारी 2010 मध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक करण्याचा विक्रम केला. त्यानंतर अनेक फलंदाजांनी द्विशतक केले. त्यानंतर रोहित शर्माने नोव्हेंबर 2014 मध्ये 173 चेंडूत 264 धावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तेव्हापासून, कोणीही त्याच्या विक्रमाच्या जवळ जाऊ शकलेले नाही. त्याने कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला. हा सामना रोहितचा पुनरागमन सामना होता. तो तीन महिने बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.
एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके
रोहित शर्माने एकदिवसीय सामन्याच्या एका डावात 264 धावा केल्या, जी खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्याकडे आणखी एक विक्रम आहे, जो यापेक्षाही खास आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत तीन द्विशतके केली आहेत. त्याने 2 नोव्हेंबर 2013 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 धावा करून पहिले द्विशतक केले. दुसरे द्विशतक त्याने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांचे होते. त्याने डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 153 चेंडूत 208 धावा करून तिसरे द्विशतक केले.
एका विश्वचषकात 5 शतके
2019 चा विश्वचषक भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी चांगला नव्हता. पण हा विश्वचषक रोहित शर्मासाठी खूप चांगला होता. त्यावेळी भारताचे मोठे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये होते आणि रोहितही उत्तम कामगिरी करत होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावा करून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध 140 धावा केल्या. त्यानंतर काही सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर त्याने इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध सलग तीन शतके केली. रोहितने या विश्वचषकात एकूण 5 शतके केली.
रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. त्याने षटकारांच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकले. रोहितने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हा विक्रम केला. रोहितने त्याच्या कारकिर्दीत 637 षटकार मारले आहेत, तर गेलने 553 षटकार मारले आहेत.
रोहितच्या नावावर आणखी एक विक्रम
रोहित शर्मा आणि शाकिब अल हसन हे दोन खेळाडू होते ज्यांनी टी-२० विश्वचषकाच्या सर्व आवृत्त्या खेळल्या. रोहितने भारतासाठी 159 टी-20 सामने खेळले आहेत. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 145 सामने खेळला आहे आणि तो रोहितचा विक्रम मोडू शकतो. भारतात रोहितनंतर विराट कोहली आहे. ज्याने 125 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये टी-20 विश्वचषकानंतर त्याने निवृत्ती घेतली.





