रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील हा पराभव केवळ दोन दिवस आणि एका सत्रात झाला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरली. त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारतीय संघ 175 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 19 धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे त्यांनी सहज गाठले.
या पराभवानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा पीसीटी आता 57.29 वर आहे. तर ऑस्ट्रेलिया 60.71 पीसीटी गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 59.26 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या शर्यतीत श्रीलंका संघाचाही समावेश आहे. जे फायनलमध्ये पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत या चार देशांचे अंतिम फेरीत जाण्याचे समीकरण काय आहे ते पाहूया.
भारताची डब्लयूटीसी अंतिम फेरी शक्यता
उर्वरित सामने: 3 (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
वर्तमान पीसीटी : 57.29
भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो, पण त्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित तीन सामने जिंकल्यास संघाची पीसीटी 64.05 पर्यंत पोहोचू शकते. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकल्यास, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिका जिंकली तरी अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.
ऑस्ट्रेलियाची डब्लयूटीसी अंतिम शक्यता
उर्वरित सामने: 5 (3 भारताविरुद्ध, 2 श्रीलंकेविरुद्ध)
वर्तमान पीसीटी : 60.71
ॲडलेडमधील विजयासह ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती मजबूत केली आहे. त्यांनी सर्व सामने जिंकल्यास, त्यांची पीसीटी 71.05 पर्यंत पोहोचेल. भारताविरुद्ध आणखी दोन विजय आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप केल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.
दक्षिण आफ्रिकेची डब्लयूटीसी अंतिम शक्यता
उर्वरित सामने: ३ (श्रीलंकेविरुद्ध 1, पाकिस्तानविरुद्ध 2)
वर्तमान पीसीटी : 59.26
दक्षिण आफ्रिकेलाही अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास त्यांची पीसीटी 69.44 होईल. जर त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आणि पाकिस्तानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली तर पीसीटी 61.11 होईल. जे डब्लयूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पुरेसे असेल.
श्रीलंकेची डब्लयूटीसी अंतिम शक्यता
उर्वरित सामने: 3 (1 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, 2 ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
वर्तमान पीसीटी : 50
अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला सर्व सामने जिंकावे लागतील. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास, पीसीटी 61.53 होईल. जर त्यांनी फक्त दोन सामने जिंकले तर त्यांचे पीसीटी 53.84 होईल. जे अंतिम फेरीसाठी पुरेसे नाही. अशा स्थितीत त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.
हेही वाचा-
एकाच दिवसात पराभवाची हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलियापासून दुबईपर्यंत टीम इंडियावर मोठी नामुष्की
टीम इंडियाचा नवा ‘सिक्सर किंग’! पदार्पणातच मोडला सेहवागचा मोठा रेकॉर्ड
गुलाबी चेंडूच्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचं कारण काय? शेवटचा पराभव कधी झाला होता?






