येत्या १९ सप्टेंबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात बांगलादेश संघाला २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, ही मालिका बांगलादेश संघाने ३-२ ने आपल्या नावावर केली आहे. बांगलादेशचा हा टी२० मालिकेत न्यूझीलंडविरुद्धचा पहिलाच विजय ठरला आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून कर्णधार टॉम लॅथमने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याने नाबाद ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावा केल्या. त्यानंतर फिन ऍलेनने देखील ४१ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटकांअखेर ५ बाद १६१ धावा करण्यात यश आले होते.
बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६२ धावांची आवश्यकता होती. बांगलादेश संघाकडून अफिफ हुसेनने ३३ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर महमदुल्लाहने २२ आणि मोहम्मद नईमने देखील २३ धावांचे योगदान दिले. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेश संघाला २० षटकांअखेर ८ बाद १३८ धावा करण्यात यश आले. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना एजाज पटेलने ४ षटकात २१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. हा सामना न्यूझीलंड संघाने २७ धावांनी आपल्या नावावर केला.
बांगलादेश संघाने गेल्या काही महिन्यांपासून अप्रतिम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला मायदेशात पराभूत केल्यानंतर, बांगलादेश संघाने आता न्यूझीलंड संघाला देखील पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने बांगलादेश संघाला पराभूत करत या मालिकेत जोरदार पुनरागमन केले होते. तर मालिकेतील चौथ्या सामन्यात बांगलादेश संघाने आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ ३ गोलंदाजांचा अनुभव ठरला टी नटराजनवर भारी; हुकली टी२० विश्वचषकाची संधी
इंग्लंड-भारत संघातील पाचवा कसोटी तर रद्द, पण कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर झाला का परिणाम?





