सध्या न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शेर ए बांगला स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तसेच या सामन्यात न्यूझीलंड संघाला ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह न्यूझीलंड संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
बांगलादेश संघ सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० मालिकेत धूळ चारली होती. त्यांनतर आता न्यूझीलंड संघाला बांगलादेश संघाने अवघ्या ६० धावांवर सर्वबाद केले आहे. न्यूझीलंड संघाचा डाव १६.५ षटकात अवघ्या ६० धावांवर संपुष्टात आला आहे. ही न्यूझीलंड संघाची टी-२० क्रिकेटमध्ये केली गेलेली सर्वात खराब कामगिरी आहे.
यापूर्वी देखील २०१४ टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाविरुद्ध चट्टोग्राम येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या ६० धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर २०१० मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध मायदेशात खेळताना न्यूझीलंड संघाचा डाव ८० धावांवर संपुष्टात आला होता. टी-२० क्रिकेटमध्ये ही न्यूझीलंड संघाची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
बांगलादेश संघाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले होते. या डावात हेनरी निकोलस आणि टॉम लेथम यांनी प्रत्येकी १८-१८ धावांचे योगदान दिले. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साधा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ज्यामुळे न्यूझीलंड संघाचा डाव १६.५ षटकात ६० धावांवर संपुष्टात आला.(New zealand have registered their lowest total in T20I)
न्यूझीलंड संघाने दिलेल्या ६१ धावांचा पाठलाग करताना शाकीब अल हसनने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. तर मुश्फीकूर रहिमने नाबाद १६ आणि महमदुल्लाहने नाबाद १४ धावांची खेळी करत, बांगलादेश संघाला हा सामना अवघ्या १५ षटकातच जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाचा ‘जॉन सिना’ अवतार, संघ सहकाऱ्याला अलगद ढकलले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल
‘धोनी, तेव्हा तू माझ्या खिशात होतास, मी नव्हे’; पीटरसनने सांगितली ओव्हल कसोटीतील जुनी आठवण
कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम