वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (3 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडला कर्णधार केन विलियम्सन व युवा रचिन रवींद्र यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रचिनचे शतक, केन विलियम्सनच्या 95 धावा व अखेरीस ग्लेन फिलिप्स याने केलेल्या आक्रमक फटकेबाजीने न्यूझीलंडने 401 धावा उभ्या केल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंड संघाला डेवॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी 68 धावांची शानदार सलामी दिली. कॉनवे 35 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन मैदानात उतरला. अंगठ्याच्या दुखापतीने त्रस्त असताना देखील त्याने सुरुवातीपासून आक्रमण करत पाकिस्तानला दबावाखाली ठेवले. दुसऱ्या बाजूने रचिन याने आपला शानदार फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. दोघांनी एकापाठोपाठ 50 धावांचा टप्पा पार केल्यानंतर आपापल्या शतकांच्या दिशेने मार्गक्रमण केले.
रचिनने 88 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, केन 95 धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. रचिन याने देखील 108 धावा करून तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर आलेल्या डेरिल मिचेल (27), मार्क चॅपमन (37) व ग्लेन फिलिप्स (41) यांनी फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. मिचेल सॅंटनरने अखेरच्या षटकांमध्ये काही मोठे फटके खेळत न्यूझीलंडला विश्वचषकात प्रथमच 400 धावांच्या पुढे नेले.
(Newzealand Post 401 Against Pakistan In ODI World Cup Rachin Ravindra Kane Williamson Shines)