सलग तीन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्ध दमदार पुनरागमन केलं आहे. बुधवारी झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 50 धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील न्यूझीलंडचा हा पहिलाच विजय ठरला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 215 धावांचा मोठा स्कोअर उभारला. डेव्हॉन कॉनवे आणि टिम सीफर्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी झालेल्या शतकी (100 धावा) भागीदारीमुळे न्यूझीलंडला मजबूत पाया मिळाला.
215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही; त्याने 8 चेंडूत 8 धावा केल्या. संजू सॅमसनने 15 चेंडूत 24 धावा करत संघर्ष केला. हार्दिक पांड्याने 5 चेंडूत 2 धावा केल्या, तर रिंकू सिंगने 30 चेंडूत 39 धावांची खेळी साकारली. रिंकूच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
रिंकू बाद झाल्यानंतर शिवम दुबेने मैदानात धुमाकूळ घातला. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावत 23 चेंडूत 65 धावांची स्फोटक खेळी केली. दुबेच्या खेळीत सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याच्या झुंजार प्रयत्नांनंतरही भारतीय संघ 18.4 षटकांत 165 धावांवर सर्वबाद झाला.
पराभवामुळे भारताला धक्का बसला असला, तरीही पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत 3-1 अशी भक्कम आघाडी कायम ठेवून आहे.






