आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण ही स्पर्धा झाल्यानंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कालवधी संपणार आहे. रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यामध्ये आता राहुल द्रविड, अनिल कुंबळे नंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकाचे देखील नाव पुढे येत आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२१ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत १४ सामने खेळले, ज्यामध्ये त्यांना अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. इतकेच नव्हे तर, हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी राहिला आहे. आता याच संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी हे भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.
डेविड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदावरून काढणे हा टॉम मूडीच्या रणनीतीचा भाग होता. मूडी आणि संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांनी अनेकदा म्हटले आहे की, हा निर्णय संघाचे नशीब बदलण्यासाठी घेतला गेला होता. परंतु माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आणखी बळकट करण्यासाठी मूडीने वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले होते.
तसेच असे देखील म्हटले जात आहे की, “सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक हे बीसीसीआयमधील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत. ज्यांचे असे म्हणणे होते की, वॉर्नरला ६ सामन्यानंतर कर्णधार पदावरून काढून युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी.” तर हैदराबाद संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी म्हटले होते की, “आम्ही अंतिम फेरीत प्रवेश करू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. आमचे असे म्हणणे होते की, युवा खेळाडूंनी मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवावा.”
महत्त्वाच्या बातम्या-
सावळा गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात भारतीय फलंदाज धावल्या एकाच दिशेला, अंपायरलाही पाडले पेचात
“केएल राहुलकडे चौफेर फटकेबाजीची रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता”