वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्याची बॅट बोलते तेव्हा प्रत्येक मैदान छोटे सिद्ध होते. पूरन सध्या इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेत नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळत आहे. त्याने मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध अशा पद्धतीने फलंदाजी केली की, सर्वांनाच धक्का बसला. पूरनच्या या खेळीमुळे सुपरचार्जर्स संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. प्रथम फलंदाजी करताना मँचेस्टरने सात गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. सुपरचार्जर्स संघाने तीन चेंडू अगोदरच हे लक्ष्य गाठले.
या सामन्यात पूरनने 113 मीटर लांब षटकार ठोकला. त्याने डावाच्या 74 व्या चेंडूवर स्कॉट करीविरुद्ध हा षटकार मारला. वेगवान गोलंदाजाने पूरनच्या पायावर चेंडू टाकला. त्याने लेग साइडला एक शक्तिशाली फटका खेळला. हा चेंडू स्टँड ओलांडून मागील झाडीत पडला. हा षटकार पाहिल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा विश्वास बसला नाही.
या सामन्यात निकोलस पूरनने 33 चेंडूत 66 धावांची खेळी केली. डावाच्या सुरुवातीला त्याला 7 चेंडूत एकही धाव करता आली नाही. सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर तो या सामन्यातही लयीत दिसला नाही. मात्र, लवकरच पूरनने त्याचे रूप दाखवले. 113 मीटर लांब षटकार मारण्यापूर्वी तो 20 चेंडूत 24 धावा करून खेळत होता. त्यानंतर त्याने अवघ्या 12 चेंडूत 42 धावा केल्या. पूरनने 33 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत 8 षटकार आणि फक्त 2 चौकारांचा समावेश होता.
पूरन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम टी20 फलंदाजांपैकी एक मानला जातो. सलामीवीर ते फिनिशर अशी कोणतीही जबाबदारी पार पाडण्यात तो सक्षम आहे. त्यामुळे जगभरातील सर्व टी20 लीगमध्ये त्याला मोठी मागणी असते. आयपीएलमध्ये तो लखनौ सुपरजायंट्स संघाचा उपकर्णधार आहे.